मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मकरसंक्रांतीला बुधवारी ठाकरे बंधू मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीच्या दरबारात सहकुटुंब दाखल झाले. त्यांनी देवीचे दर्शन घेऊन विजयाचे साकडे घातले.
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मातोश्रीवरून राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. तेथून दोन्ही ठाकरे बंधू आपल्या कुटुंबांसह एकत्रितपणे मुंबादेवीच्या मंदिराकडे रवाना झाले. दर्शनावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयजयवंती ठाकरे, आदित्य, अमित, उर्वशी यांच्यासह ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शिवतीर्थ निवासस्थानी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. निवडणुकीपूर्वीची रणनीती आखताना बोगस आणि दुबार मतदारांवर नजर ठेवण्याबाबत चर्चा झाली.
तसेच मतदारांना भाजप, शिवसेनेकडून पैसे वाटप केले जाण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारीत राहावे, मतदारांशी संपर्क आणि मतदानाच्या दिवशी पूर्ण तयारीनिशी सज्ज रहा,असे आदेश ठाकरे बंधूंनी पदाधिकाऱ्यांना दिले.
मुंबई ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबादेवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी छायाचित्रात रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयजयवंती ठाकरे, आदित्य, अमित, उर्वशी ठाकरे दिसत आहेत.