मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या सहभागाने येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत काढण्यात येणाऱ्या ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना’ मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत आता हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी समाजमाध्यमावर पोस्ट करून मोर्चाच्या बदललेल्या मार्गाची माहिती दिली. या मोर्चाचा पूर्वनियोजित मार्ग बदलण्याची विनंती मुंबई पोलिसांनी केली होती.
पोलिसांच्या या विनंतीला मान देऊन मार्ग बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता ‘मेट्रो सिनेमा ते महानगरपालिका मुख्यालय’ असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे. या बदलाची मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
लोकशाहीत जनता सार्वभौम : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलने, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचे सार आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.