मुंबई / पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली. परंतु, यामध्ये काही प्रश्नांमध्ये मुद्रणात चुका झाल्यामुळे परीक्षा परिषदेतर्फे हे प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. पेपर क्रमांक दोनमधील गणित-विज्ञान या वैकल्पिक विषय मराठी माध्यमाचे चार प्रश्न, तर कन्नड माध्यमाचे 12 प्रश्न रद्द झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विषयाचे उत्तीर्णतेचे प्रमाण बदलणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकतीच टीईटी परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली. या उत्तरसूचीनंतर आता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप नोंदवता येणार नाहीत. उमेदवार अंतिम उत्तरसूची पाहून आपल्याला किती गुण मिळाले हे तपासून पाहू शकतात. त्यामुळे उमेदवारांना पास झालो किंवा नाही, हे संबंधित उमेदवारांना समजणार आहे. परंतु प्रिंटिंग मिस्टेकमुळे काही प्रश्न रद्द केले आहेत.
परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरसूचीतील काही प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या पेपर क्रमांक दोनमधील गणित-विज्ञान या वैकल्पिक विषयासह सामाजिकशास्त्र या विषयातील प्रश्न रद्द झाले आहेत.
यासंदर्भात राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, निकालासंदर्भात काम चालू असून, रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण दिले जाणार आहेत. टीईटीच्या सर्वच माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेतील फारसे प्रश्न रद्द झाले नाहीत. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये टीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.