मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन एक्स्पो 2026 साठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील तीन एकर जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर मंजुरीसाठी येण्याआधीच संबंधित कंपनीने पूर्वतयारीचे साहित्य विद्यापीठ परिसरात आणून ठेवले. सदर बाब उघडकीस येताच युवासेना (उबाठा) संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला.
मुंबई विद्यापीठाची गुरुवारी होत असलेल्या व्यवस्थापन परिषद सभेत हा प्रस्ताव अधिकृत मंजुरीसाठी 8 व्या प्रस्तावानुसार मांडण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच प्रोकम इंटरनॅशनल या कंपनीकडून बुधवारीच या संदर्भातील साहित्य आणून टाकण्यात आल्याने, राजकीय दबावाखाली विद्यापीठाचे प्रशासन चालवणार का? असा सवाल उपस्थित करत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी यांना निवेदन पाठवत विचारला आहे.
विद्यापीठाकडून ही प्रक्रिया नियमानुसारच करण्यात आली असून दबावाचा प्रश्न उद्बवत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.