Tata Memorial Research on Carica Papaya Leaf Extract in Cancer Treatment
मुंबई : कॅन्सर उपचारात आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा प्रभावी संगम घडवून आणण्यात टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या संशोधकांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. केमोथेरपीमुळे कमी होणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी पपईच्या पानांच्या अर्कापासून तयार करण्यात आलेली गोळी प्रभावी ठरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अवघ्या सुमारे ३०० रुपयांत उपलब्ध होणारा हा उपचार महागड्या औषधांना परवडणारा स्वदेशी पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
टाटा मेमोरियलमधील डॉ. विकास ओस्तवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात सॉलिड ट्यूमर असलेल्या २१९ कर्करुग्णांचा समावेश होता. तीन वर्षे चाललेल्या या अभ्यासात पपईच्या पानांच्या अर्कापासून तयार करण्यात आलेल्या 'कॅरिफ्रिल' गोळ्या घेतलेल्या रुग्णांमध्ये केवळ चार दिवसांत प्लेटलेट्स सुरक्षित पातळीपर्यंत वाढल्याचे आढळले. त्यामुळे पुढील केमोथेरपी उशिरा देण्याची किंवा औषधांचा डोस कमी करण्याची गरजही तुलनेने कमी भासली.
या संशोधनाचे निष्कर्ष २०२५ मध्ये शिकागो येथे झालेल्या अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या वार्षिक परिषदेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये ते प्रकाशित झाले.
संशोधकांच्या मते, चाचण्यांदरम्यान पपईच्या पानांचा अर्क सुरक्षित आणि रुग्णांकडून सहज सहन होणारा असल्याचे दिसून आले. कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत. मात्र, या औषधाची कार्यपद्धती, त्यातील सक्रिय घटक आणि दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आणखी व्यापक संशोधनाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या केमोथेरपीमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यास प्लेटलेट ट्रान्सफ्युजन, रोमिप्लोस्टिम आणि एल्ट्रोम्बोपॅग यांसारख्या महागड्या उपचारांचा वापर केला जातो. रोमिप्लोस्टिमच्या मूळ ब्रँडच्या एका डोसची किंमत सुमारे १.६ लाख रुपये असून, जेनेरिक औषधासाठीही ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागतात. एल्ट्रोम्बोपॅगच्या एका स्ट्रिपची किंमत ३ ते ४ हजार रुपये आहे. त्याच्या तुलनेत पपईच्या पानांच्या अर्कापासून तयार केलेल्या गोळ्यांचा संपूर्ण उपचारक्रम अवघ्या ३०० रुपयांत पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे कर्करुग्णांवरील उपचाराचा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.