TMC free wig initiative pudhari photo
मुंबई

TMC free wig initiative : कर्करुग्णांना मोफत नैसर्गिक केसांचे विग

टाटा मेमोरियल-चेरियन फाउंडेशनचा करार; दीड कोटींचे ५०० विग देणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कर्करोगाच्या उपचारादरम्यान केस गळतीमुळे आत्मविश्वास गमावणाऱ्या रुग्णांना आता मोठा आधार मिळणार आहे. टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) आणि चेरियन फाउंडेशन यांच्यात कर्करुग्णांना मोफत नैसर्गिक मानवी केसांपासून तयार केलेले उच्च दर्जाचे विग उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारानुसार मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे देशभरातील टाटा मेमोरियल सेंटरच्या संस्थांसाठी विग वितरणाचे मुख्य केंद्र राहणार आहे. रुग्णांची गरज लक्षात घेऊन विगचे वाटप, वापराची नोंद आणि त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

यापुढेही चेरियन फाउंडेशन दरवर्षी १ हजार नैसर्गिक केसांचे विग तयार करून देणार आहे. हे विग टाटा मेमोरियल सेंटरसह फाउंडेशनच्या भागीदार रुग्णालयांमधील गरजू रुग्णांना मोफत दिले जातील.

केस गळतीचा मानसिक परिणाम

कर्करोगाच्या उपचारातील केमोथेरपीमुळे मोठ्या प्रमाणावर केस गळतात. विशेषतः स्तन आणि स्त्रीरोगविषयक कर्करोगाचे निदान झालेल्या सुमारे ९० टक्के महिलांना केमोथेरपी दिली जाते. केस गळणे हा उपचाराचा दिसून येणारा आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक दुष्परिणाम आहे. त्यामुळे काही रुग्णांमध्ये आत्मविश्वास कमी होऊन सामाजिक संकोच निर्माण होतो.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. शलाका जोशी यांनी सांगितले की, दर्जेदार नैसर्गिक केसांचे विग रुग्णांचा आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत करतात. मात्र, अशा विगचा खर्च आरोग्य विम्यात समाविष्ट नसल्याने अनेक कुटुंबांना तो परवडत नाही. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले की, कर्करोगाच्या उपचारासोबत रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य आणि जीवनमानही महत्त्वाचे आहे. दर्जेदार नैसर्गिक केसांचे विग रुग्णांना उपचाराच्या काळात आत्मविश्वासाने आणि सन्मानाने सामोरे जाण्यास मदत करतील.

‘केस गळणे म्हणजे केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही’

चेरियन फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त सारा चेरियन यांनी स्वतः कर्करोगाचा सामना केला आहे. केस गळणे हा केवळ दिसण्याशी संबंधित विषय नसून त्याचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. देशभरात रुग्णालयांच्या माध्यमातून विग बँक उभारण्याचे आणि गरजू प्रत्येक रुग्णाला सन्मानाने विग उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१.५ कोटींचे ५०० विग

चेरियन फाउंडेशनच्या ‘गिफ्ट हेअर, गिफ्ट कॉन्फिडन्स’ या उपक्रमातून टाटा मेमोरियल सेंटरला सध्या ५०० चांगल्या दर्जाचे नैसर्गिक केसांचे विग देण्यात येणार आहेत. या विगची एकूण किंमत दीड कोटी रुपये आहे. सहभागी केंद्रांमधील रुग्णांच्या गरजेनुसार विगचे वाटप केले जाणार आहे.

३० हजारांहून अधिक केसदाते

‘गिफ्ट हेअर, गिफ्ट कॉन्फिडन्स’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू झाला. आतापर्यंत या उपक्रमातून ३० हजारांहून अधिक नागरिकांनी केसदान केले आहे. देशभरातील ३५ पेक्षा अधिक भागीदार रुग्णालयांमार्फत २,५०० हून अधिक नैसर्गिक केसांचे विग मोफत वितरित करण्यात आले आहेत. केसदानापासून विग तयार करणे, त्याची गुणवत्ता तपासणे, गरजू रुग्णांना मोफत देणे, विगची दुरुस्ती आणि रुग्णांना मदत करणे अशी संपूर्ण प्रक्रिया या उपक्रमातून राबविली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT