Mumbai BEST Service Pudhari
मुंबई

Mumbai BEST Service: रुग्णांसाठी मोफत ‌‘बेस्ट‌’सेवा अशक्यच!

पालिकेत ठराव मंजुरीच्या उंबरठ्यावर, पण बेस्टची आर्थिक अडचण आडवी; रुग्णांना दिलासा अद्याप दूर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रेल्वे स्टेशन ते हॉस्पिटल दरम्यान मोफत बससेवा सुरू करण्याची मागणी भाजपाने केली आहे. तसा ठरावही महापालिका सभागृहात मंजूर करण्यात येणार आहे. मात्र बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता, ठराव मंजूर झाला तरी त्याची अंमलबजावणी होणे शक्य नाही. त्यामुळे मोफत बस सेवेची मागणी कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेची 4 प्रमुख हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालये, 1 दंत हॉस्पिटल, 15 उपनगरी हॉस्पिटल, 6 विशेष हॉस्पिटल आणि 29 प्रसूतिगृहे आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यामुळे अशा रुग्णांकडे रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी ही पैसे नसतात. त्यामुळे अनेकजण स्टेशन ते हॉस्पिटल चालत प्रवास करतात. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रेल्वे स्टेशन ते हॉस्पिटल दरम्यान मोफत रुग्ण बस सेवा सुरू करावी, अशा ठरावाची सूचना भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शितल गंभीर यांनी सभागृहात मांडली आहे. महापालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता असल्यामुळे या ठरावाच्या सूचनेला मार्च महिन्याच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पण महापालिकेत ठराव मंजूर झाला तरी मोफत प्रवासाची अंमलबजावणी करणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बेस्टला परवडणारे नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिकेकडे मदत मागावी लागत आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने 1 हजार कोटी रुपये बेस्टला मदत देण्याचे मान्य केले आहे. तशी तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र हे एक हजार कोटी रुपये

पुरेसे नसून बेस्टला किमान 5 हजार कोटीची आर्थिक मदत हवी आहे. अशा परिस्थितीत महापालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लाखो रुग्णांना मोफत बससेवा पुरवल्यास बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोफत प्रवासाची अंमलबजावणी करणे सध्या तरी शक्य नसल्याचे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेत मोफत प्रवासाचा ठराव झाला तरी, त्याचा लाभ रुग्णाला मिळणे अशक्य आहे.

स्वतंत्र बस ठेवणे अशक्य मुंबई शहर व उपनगरात जवळपास सर्वच रेल्वे स्टेशन येथून महापालिका हॉस्पिटलमध्ये जाणारे रुग्ण असतात. त्यामुळे प्रत्येक स्टेशनला स्वतंत्र बस ठेवणे शक्य नाही. दादर येथून टाटा हॉस्पिटल, केईएमसाठी बससेवा सुरू आहे. अशाच प्रकारे अन्य स्टेशनवरून बस सुरू करता येतील. पण त्यासाठी सध्या असलेले भाडे रुग्णांना मोजावेच लागेल.

पालिकेने आर्थिक मदत केल्यास शक्य

मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदत केल्यास महापालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोफत बस पास देणे शक्य आहे. सर्वच रुग्णांना मोफत पास द्यायचा लागल्यास किमान 100 कोटी रुपयांची आवश्यकता भासेल. ही आर्थिक मदत महापालिकेने देण्यास तयारी दर्शविल्यास मोफत बस पास चा विचार करता येऊ शकतो, असेही बेस्ट अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT