मुंबई

Pawar vs Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ कोल्ड वॉर? अजितदादांनंतर राष्ट्रवादीत संघर्षाचे नवे पर्व

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या संघर्षाची नांदी पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या संघर्षाची नांदी पाहायला मिळत आहे. विलिनीकरणाची चर्चा आता जवळपास संपुष्टात आली असून, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेऊन अजित पवार गटाने शरद पवारांना विश्वासात न घेता आपली स्वतंत्र चूल मांडल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शरद पवारांना 'नॉन-प्लस' करण्याची पहिलीच वेळ?

‘पुढारी न्यूज’च्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाला बाजूला सारून किंवा त्यांना 'नॉन-प्लस' करून निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या साथीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांचे पीआर कॅम्पेन पाहणारे नरेश अरोरा या संपूर्ण घडामोडींचे सूत्रधार असल्याचे दिसत असून, दोन पवारांच्या गटात कोणतेही अधिकृत संवाद नसल्याचे उघड झाले आहे.

भाजपची सावध भूमिका

या सर्व खेळात भारतीय जनता पक्षाने अत्यंत सावध आणि धुरंदर रणनीती अवलंबली आहे. भाजपने कुठेही स्वतःला 'ड्रायव्हिंग सीट'वर दाखवलेले नाही. ‘राष्ट्रवादीचा हा अंतर्गत निर्णय आहे,’ असे सांगून भाजपने हात झटकले असले, तरी पडद्यामागे सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांचे राजकीय महत्त्व वाढू नये, हीच भाजपची रणनीती असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांना भाजपच्या शक्तीची कल्पना असल्याने त्यांनी पवारांना 'श्रद्धास्थान' म्हणून लांब ठेवत सत्तेचा मार्ग निवडला आहे, असेही मत मृणालिनी नानिवडेकर यांनी मांडले आहे.

सुनेत्रा पवारांची निवड : शरद पवार काय करणार?

दुर्दैवी घटनेतून सावरत असतानाच सुनेत्रा पवार आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. शरद पवार हे राजकारणातील धुरंदर खेळाडू आहेत, त्यामुळे ते कदाचित हा निर्णय ‘आपलाच आहे’ असे दाखवून सुनेत्रा पवारांना आशीर्वाद देण्याचे मोठेपण दाखवू शकतात. मात्र, पुतण्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट सत्तापद स्वीकारणे, हे शरद पवारांच्या राजकीय वर्चस्वाला दिलेले आव्हान मानले जात आहे, अशीही चर्चा सुरू आहे.

विलिनीकरण आता 'दूरचे स्वप्न'

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, हे आता एक 'धूसर स्वप्न' उरले आहे. जर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना एनडीएच्या राजकारणात यायचे असेल, तर भाजप त्यांना आपली भूमिका पूर्णपणे बदलण्याची अट घालू शकते. सध्याच्या स्थितीत, सुनेत्रा पवारांनी सत्तापद स्वीकारून पवार कुटुंबातील कथित मतभेद आणि सत्तेची ओढ स्पष्ट केली आहे, असेही नानिवडेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT