26/11 Mumbai Attack Mastermind Tahawwur Rana  pudhari photo
मुंबई

Tahawwur Rana : मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट होतो..., २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वुर राणाची सर्वात मोठी कबुली

26/11 Mumbai Attack Mastermind Tahawwur Rana : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार तहव्वुर राणाने तपास यंत्रणांसमोर अनेक मोठे खुलासे केले आहेत.

मोहन कारंडे

26/11 Mumbai Attack Mastermind Tahawwur Rana

मुंबई : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार तहव्वुर राणाने तपास यंत्रणांसमोर अनेक मोठे खुलासे केले आहेत. "मी पाकिस्तानी लष्कराचा एक विश्वासू एजंट होतो आणि २६/११ हल्ल्याच्या वेळी मुंबईतच होतो," अशी कबुली राणाने दिली आहे. त्याला आखाती युद्धादरम्यान सौदी अरेबियातही पाठवण्यात आले होते, असेही त्याने सांगितले.

दिल्लीतील तिहार तुरुंगात NIAच्या कोठडीत असलेल्या राणाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला चौकशीत सांगितले की, त्याने आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडलीने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबासोबत अनेक वेळा प्रशिक्षण घेतले होते. लष्कर-ए-तोयबा ही केवळ एक दहशतवादी संघटना नसून, ती गुप्तहेर नेटवर्कप्रमाणे काम करत असल्याचे त्याने सांगितले.

मुंबईत तळ ठोकून रचला होता कट

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राणाने सांगितले की, मुंबईत आपल्या कंपनीचे इमिग्रेशन सेंटर सुरू करण्याची कल्पना त्याचीच होती. त्यासंबंधी आर्थिक व्यवहार व्यवसाय खर्चाच्या नावाखाली करण्यात आले. त्याने हेही कबूल केले की २६/११ हल्ल्याच्या वेळी तो मुंबईतच होता आणि हल्ल्याच्या कटात सहभागी होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणांची पाहणी केली होती. २६/११ चा हल्ला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISIच्या मदतीने करण्यात आला होता, अशी त्याने कबुली दिली आहे.

कॅनेडियन नागरिक आणि अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण

६४ वर्षीय राणाने हेही सांगितले की, आखाती युद्धादरम्यान त्याला पाकिस्तानी लष्कराने सौदी अरेबियात पाठवले होते. चौकशीनंतर मुंबई पोलीस राणाला लवकरात लवकर अटक करून आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असलेल्या राणाला या वर्षाच्या सुरुवातीला भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका ४ एप्रिल रोजी फेटाळल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. मे महिन्यात भारतात आणल्यानंतर एनआयएने राणाला औपचारिकपणे न्यायालयीन कोठडीत ठेवले. त्याच्यावर कट रचणे, हत्या, दहशतवादी कृत्य आणि बनावटगिरी यांसारख्या अनेक आरोपांखाली चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात दिल्लीतील न्यायालयाने राणाची न्यायालयीन कोठडी ९ जुलैपर्यंत वाढवली होती.

26/11 हल्ल्याची पार्श्वभूमी

२००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यात १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेल्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ज्यू सेंटर नरिमन हाऊस यांसारख्या प्रमुख ठिकाणांना लक्ष्य कले होते. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT