Supriya Sule Delhi Visit Pudhari
मुंबई

Supriya Sule: 'बाबा रुग्णालयात आहेत...' सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय; संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला कधी जाणार? महत्त्वाची अपडेट

Supriya Sule Delhi Visit: वडिलांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे यांनी दिल्ली दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Shelke

Supriya Sule Delhi Visit: शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात बदल केला आहे. शरद पवार रुग्णालयात असल्याने या आठवड्यात त्या मुंबईतच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्या सोमवारी सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. 'बाबा रुग्णालयात असल्यामुळे मी या वीकेंडला मुंबईतच असेन. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी सकाळीच दिल्लीला जाईन,' असा मेसेज त्यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, शरद पवार यांना गुरुवारी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात त्यांना तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे, संसदेच्या आगामी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. या विधेयकांतर्गत विविध राज्यांमधील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच राज्यांमधील जागांच्या वाटपाची सध्याची व्यवस्था २०५१ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांशीही संपर्क साधल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

विरोधकांनी या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची चिंता, तर दुसरीकडे संसदेतील महत्त्वाचे राजकीय घडामोडी अशा दुहेरी पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा दिल्ली दौरा चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT