सुपर स्पेशालिटीवरून नवी मुंबईचे राजकारण तापले pudhari photo
मुंबई

Civic politics Navi Mumbai : सुपर स्पेशालिटीवरून नवी मुंबईचे राजकारण तापले

तहकूब महासभेत भाजपच्या 65 नगरसेवकांचा विरोध, दुसऱ्या जागेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : बेलापूरममधील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयावरून नवी मुंबईचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. हॉस्पिटल मैदानाच्या जागेवर नको, दुसरी पर्यायी जागा द्यावी, असा सूर लावत सोमवारी झालेल्या तहकूब महासभेत सत्ताधारी भाजपच्या 65 नगरसेवकांनी प्रकल्पाला कडाडून विरोध केला.

शिवसेनेने हा प्रस्ताव रद्द न करण्याबाबत नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे नगरविकास विभाग काय निर्णय घेणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा हा ड्रीम प्रोजक्ट आहे. मंत्री गणेश नाईक गटाने सुरुवातीपासूनच याला विरोध दर्शवला आहे. मात्र त्याला न जुमानता आमदार मंदा म्हात्रे यांनी मैदानाचा भूखंड पदरात पाडून घेतला.

त्यानंतर महापालिकेने 28 कोटी रुपये सिडकोला भरणा केले आणि भूखंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी घेतला. तेंव्हापासून धूसफूस सुरू होती. नवी मुंबई महापालिकेची सत्ता हातात येताच मंत्री गणेश नाईक गटाने हा मुद्दा ऐरणीवर आणत हॉस्पिटलचा प्रस्ताव रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला.

सोमवारी तहकूब महासभेत हा प्रस्ताव येताच भाजपच्या 65 नगरसेवक आणि उबाठा गटाचे नगरसेवक प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले. फक्त मनसेने या हॉस्पिटलला पाठिंबा दर्शवला. आता हा प्रकल्प राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला असून, 66 नगरसेवकांच्या विरोधानंतर आमदार मंदा म्हात्रे काय भूमिका घेणार? बेलापूरमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभे राहणार की राजकारणाच्या भोवऱ्यात अडकणार, याकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.

अभ्यासासाठी प्रस्ताव आरोग्य समितीकडे वर्ग

महापालिकेत समाविष्ट 14 गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज येथील नगरसेवकांनी यावेळी बोलून दाखवली. उपमहापौर दशरथ भगत यांनी हॉस्पिटलसाठी येणारा खर्च, त्यासाठीची तरतूद, आवश्यक मनुष्यबळ, कार्यपद्धती याविषयी याविषयी अभ्यास करण्याची सूचना केली. या प्रस्तावावरील सविस्तर चर्चेनंतर महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रस्ताव पुढील सखोल अभ्यासासाठी आरोग्य समितीकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. आरोग्य समितीकडून अहवाल आल्यानंतर हा विषय पुन्हा सर्व साधारण सभेमध्ये मंजुरीसाठी घेण्यात येणार आहे. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची जागा बदलण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांना सभागृहाच्या वतीने विनंती पत्र देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT