मुंबई

Sunil Tatkare on ncp conflict | "मी नाराज नाही, माझी कोणावर नाराजी नाही" : सुनील तटकरेंची स्‍पष्‍टोक्‍ती

Sunil Tatkare on ncp conflict |राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अस्वस्थता आठवडाभरात शमणार

पुढारी वृत्तसेवा

Sunil Tatkare on ncp conflict

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मी पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही. अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार, जय पवार राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. आम्हाला पक्षाची पुढची वाटचाल करायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (दि. २१) माध्यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्‍यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असलेली अस्वस्थता आठवडाभरात शमणार असल्याचे समजते. पुढच्या आठवड्यात मुंबईत पक्षाची बैठक बोलावली जाणार आहे आणि या बैठकीमध्ये मागील काही काळात असलेले सर्व विषय निकाली काढले जाणार असल्याचे समजते. यामध्ये पदाधिकाऱ्यांना पदे वाटप, निवडणूक आयोगाशी संबंधित पत्रव्यवहार अशा बाबींचा समावेश आहे.

४२ वर्ष मी राजकारणात

यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या प्रवासावरही भाष्य केले. एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, ४२ वर्षे मी राजकारणात आहे. यामध्ये तालुका काँग्रेसच्या सरचिटणीस पदापासून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष खासदार अशी विविध पदे भूषवली आहेत. राज्यभर फिरलो आहे. या प्रवासात वसंतदादा पाटील, शरद पवार, अजित पवार, आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत काम केले, असा दाखलाही त्यांनी दिला.

शरद पवारांच्या भेटीवर तटकरे काय म्‍हणाले?

शरद पवारांच्या भेटीवर सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवारांनी देशाच्या राजकारणात, समाजकारणात ६ दशके योगदान दिले आहे. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. मात्र मागील ३ वर्षात माझी भेट झाली नव्हती. गेल्या काही काळात त्यांची प्रकृती बरोबर नसल्याने त्यांच्या भेटीचा वेळ मागितला होता. त्यानुसार मी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही आणि तिथे कोणाबद्दल तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तर शरद पवारांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, मी १९८७-८८ पासून त्यांच्यासोबत काम केले. ते पाहता त्यांनी मोठ्या मनाने कौतुक केले असेल, असेही ते म्हणाले.

पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही

पक्षातील नाराजीच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले की, पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही. अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार, जय पवार राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. आम्हाला पक्षाची पुढची वाटचाल करायची आहे.

लवकरच सगळे महाराष्ट्र दौरा करणार

निवडणूक आयोगाशी संबंधित पत्रावर बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आहे आणि तो विषय संपला आहे. आम्ही आता लवकरच सगळे महाराष्ट्र दौरा करणार आहोत. पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात करणार आहोत. आमचे समज आणि गैरसमज दूर झाले आहेत. मी कधीही नाराज नव्हतो. आम्ही एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयात मी एक महत्त्वाचा घटक आहे. पक्ष एकत्र काम करत पुढे निघाला आहे.

मी मागच्या दाराने निवडून आलो नाही- तटकरे

मी मागच्या दाराने निवडून आलो नाही, असे सांगत च झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेचा फॉर्म देताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केली आहे. तो फॉर्म वैध आहे, त्यात काही अडचण नाही. काही अंदाज वर्तवले जातात पण काळाच्या ओघात त्याची उत्तर मिळत असतात, असेही तटकरे यांनी नमूद केले.

विलीनीकरणाच्‍या प्रश्‍नावर बोलण्‍याचा प्रश्‍नच नाही

विलीनीकरणाच्या संदर्भाने बोलताना म्हणाले की, काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची बैठक झाली. त्यात सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर विधान केले की, विलीनीकरण होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे त्यावर काही बोलण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT