मुंबई : माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री अनिल पाटील, आ. झिशान सिद्दिकी आदींनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अभिवादन केले. pudhari photo
मुंबई

Sunetra Pawar : पक्ष शिस्तीला हानिकारक गोष्टी खपवून घेणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा नेत्यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : काही जणांच्या गंभीर चुका पक्षशिस्तीला आणि पक्षाच्या प्रतिमेला हानिकारक ठरत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात दिला. माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अनेक विषयांवर सविस्तर विवेचन केले.

पक्षासाठी किती वर्षे काम केले, यापेक्षा त्या काळात पक्षाला किती पुढे नेले, याचा विचार केला जाईल. एवढी वर्षे पक्षात राहून पक्ष मोठा केला की स्वतःच मोठे होण्याचा प्रयत्न केला, याचेदेखील परीक्षण केले जाईल, असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर 'घरोघरी राष्ट्रवादी, मनोमनी राष्ट्रवादी' हा मंत्र राज्यभरात पोहोचवा, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केले. पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे पहिल्यांदाच राजकीय भाष्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, वादळांना पाहून आम्ही गलबते वळवली नाहीत. संकटांना सामोरे जाताना आम्ही कधी आमची पावले रोखली नाहीत. घड्याळाच्या काट्यांचा हा प्रवास आता थांबणारा नसून संघर्षाच्या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी शरद पवार गटाचे नाव न घेता दिला आहे. त्या म्हणाल्या, आजपर्यंतच्या प्रवासात आपल्या पक्षाने अनेक चढ-उतार आणि सत्ता पाहिली आहे, पण कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही.

१५ जून ते १६ ऑक्टोबरदरम्यान पदवीधर मतदार नोंदणी आणि शिक्षक मतदार नोंदणी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन केले. एकीकडे राजकीय भाषण आणि दुसरीकडे भावना व्यक्त करत असताना त्यांना दाटलेला कंठ आवरता आल्या नाहीत. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्या सर्वांचे नेते अजित पवार आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय होणारा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. या पक्षाच्या जडणघडणीत शरद पवार, तारिक अन्वर, पी.ए. संगमा यांसारख्या दिग्गज नेत्यांसह ज्ञात-अज्ञात अशा शेकडो कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे योगदान आहे, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

देश घडविण्यात बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आगामी काळात राज्यातल्या उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी तयारी करुन कामाला लागावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनणार : सुनील तटकरे

तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांनी पत्र दिले होते. त्या यादीत कोणाचे पहिले नाव होते याचा कागद शोधून काढा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले. तसेच भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अव्वल स्थानासह बोनस गुणासहीत यश मिळवेल, असा दावाही त्यांनी केला.

तटकरे म्हणाले, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरवले गेले असते तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. याशिवाय एक क्रमांकाचे स्थान कोणी हिरावून घेतले नसते. इतके काम अजित पवार यांनी केले होते. बुधवारी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. यामागे त्यांच्या त्यागाची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे.

पक्षाचे काम करणाऱ्यांना न्याय देणार

आमदार आणि खासदारांच्या कोलांटउड्या, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतराचीही सुनेत्रा पवार यांनी दखल घेतली. त्या म्हणाल्या, प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या पक्षातील आमदार आणि खासदारांना सरकारमध्ये योग्य संधी देण्याची जबाबदारी माझी असेल. पक्षाचे काम करणाऱ्यांना न्याय हेच यापुढील काळात माझे सूत्र असेल.

विविध महामंडळे आणि त्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच केल्या जाणार आहेत. आपल्या वाट्याला येणाऱ्या महामंडळांवरील नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्षासाठीथे समर्पण हे महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातील. पक्षाकडे ज्यांनी अर्ज केले असतील, त्यांच्याशी मी व्यक्तिशः संवाद साधणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आमागी काळात पक्षवाढीसाठी प्रत्येक झयाला चार जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल. त्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी तालुकानिहाय 'जनता दरबार' घ्यावेत. मंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात संबंधित जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष सोबत राहतील. दोन महिन्यातून एकदा संबंधित जिल्ह्याच्या पक्ष संघटनेची संबंधित मंत्री बैठक घेतील.

निवडणुकांमधील यश आता शहरे ठरविणार - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागात खोलवर असला तरी आता वाढती लोकसंख्या पाहता निवडणुकांमधील यश आता शहरे ठरविणार आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. पटेल म्हणाले, याच षण्मुखानंद सभागृहातून जन्म झालेल्या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अनेक राज्यांत आपले आमदार, खासदार निवडून आले आहेत. अरुणाचल प्रदेश, नागालैंड आणि आणखी एका राज्यात लोकप्रतिनिधी निवडून आल्यास आपल्याला राष्ट्रीय पक्षाची पुन्हा मान्यता मिळेल. त्यासाठी अजित पवार यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT