Sunetra Pawar oath ceremony
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. उपमुख्यमंत्री पदासोबतच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची आज निवड केली जाईल. या शपथविधी सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाले आहेत.
आज दुपारी २ वाजता विधानभवनातील कॅबिनेट सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर आमदारांच्या संमतीचे पत्र मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिले जाईल. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारख्या प्रमुख नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राज्यपालांच्या संमतीनंतर लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
विधिमंडळ नेता निवडीसाठी आज होणाऱ्या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सदनांमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदारांना बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाणार आहे. ही निवड एकमताने होईल. परंतु, या बैठकीतच त्यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सोपविले जाणार आहे. केंद्रीय कार्यकारिणीकडून त्यानंतर सोपस्कार पार पाडून घेतले जातील, अशी माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा अजित पवार यांचे कुटुंब असेल, याला आमचे पूर्ण समर्थन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू. मला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेटून जे काही पर्याय आहेत त्याची माहिती दिली आहे. अजित पवार यांचे कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष याला आमचा पाठिंबाच राहील. जी काही प्रक्रिया करायची आहे ती त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे.