Sunetra Pawar Pudhari
मुंबई

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रिपदासाठी खा. सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत

शिंदे सेनेचा उपद्रव रोखण्यासाठी अजित पवार गट पूर्ण संख्येने सरकारमध्ये राहावा हीच भाजपची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नरेश कदम

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार? असा प्रश्न चर्चेत आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे आमदार आग्रही आहेत. सद्यस्थितीत भाजपचे नेतृत्वदेखील उपमुख्यमंत्रिपद खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यास राजी असल्याचे कळते.

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असा जो तर्क मांडला होता तो तूर्त बाजूला पडण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाला सत्तेचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकीकरण नको आहे आणि भाजपच्या सत्तेसोबत येण्यास शरद पवार आजही तयार नाहीत.

परिणामी, राष्ट्रवादीच्या दोन गटांची स्थिती ‌‘जैसे थे‌’ राहण्याची चिन्हे आहेत. फरक इतकाच की, हे दोन गट निवडणुकीच्या मैदानात एकत्र दिसतील आणि महायुतीच्या सत्तेत मात्र अजित पवार गट सरकारमध्ये, तर शरद पवार गट विरोधात हेच चित्र कायम राहील, असे राष्ट्रवादीच्या अंत:स्थ सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना हे सत्तासूत्र मान्य असल्याने आता उपमुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अजित पवार गटाला सोडवायचा असून, ‌‘पवार‌’ या नावानेच या गटाचे राजकारण पुढे सुरू राहणार असल्याने पक्षाचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ही दोन्ही पदे अजित पवारांच्याच कुटुंबाकडे जातील, अशी चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेतृत्व अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे असावे, असे या गटाचे बहुतांश मंत्री आणि आमदारांना वाटत आहे. नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अजित पवार यांच्या कुटुंबाकडे असावे, अशी आग्रही भूमिका आता जाहीरपणे मांडली आहे.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय हे राजकारणात अगदीच नवखे आहेत. सुनेत्रा पवारदेखील तशा सराईत राजकारणी नसल्या, तरी दोन्ही मुलांच्या तुलनेत त्यांचा संबंध राजकारणाशी आणि त्यातही बारामतीतील राजकारणाशी अधिक आलेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच देण्यात यावे, असा आग्रह सुरू झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी वेगळा गट केला तेव्हा त्यांना मानणारे आमदार त्यांच्यासोबत गेले होते. या गटातील आमदार दुसऱ्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारतील, अशी स्थिती पक्षात नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यासारखे वरिष्ठ नेते पक्षात आहेत; पण अजित पवार गटातही मराठा आणि ओबीसी असे गटा-तटाचे राजकारण आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्व त्यांच्यासाठी अनुकूल नाही. महायुती सरकारमधील क्रमांक एकचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपद्रव रोखण्यासाठी अजित पवार यांना सरकारमध्ये बहुमताची गरज नसताना घेण्यात आले.

अजित पवार यांच्या निधनानंतर शिंदे यांचा उपद्रव वाढू नये, याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून अजित पवार गट पूर्ण संख्येने सरकारमध्ये राहावा, असेच भाजपश्रेष्ठींचे धोरण आहे. परिणामी, अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जाऊ नयेत, याची खबरदारी भाजपचे नेते घेतील.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र व्हावेत, अशी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची इच्छा असली, तरी राज्याच्या सत्तेतून बाहेर पडायचे नाही, ही अजित पवार गटाची ठाम भूमिका असल्याने अजित पवार यांच्या कुटुंबाकडे म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT