मुंबई ः राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून दि. 28 जानेवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवलेली पत्रे वैध मानू नका असे कळवले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत जी पत्रे पाठवली गेली त्या पत्रांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मोठी भूमिका होती.या काळातील सर्व पत्रव्यवहार हा रद्द करावा, तो अधिकृत मानू नये अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यावर त्या नाराज आहेत काय असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पत्रामुळे त्या काळात घेतलेले निर्णय वैध मानायचे नाहीत म्हणजे कसे असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार या दोन्ही सहकाऱ्यांवर नाराज होते असे बोलले जात होते. त्यांच्या हयातीतच ही नाराजी सुरु झाली होती. त्यांच्या निधनानंतर या दोघांनीही पक्षाच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सातत्याने केला आहे.
बुधवारी रोहित पवार यांनी विधिमंडळात अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य बाहेर येऊ द्या अशी मागणी केली असताना सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले पत्र बुचकळ्यात टाकणारे आहे. संपूर्ण दिवसभर या पत्राची चर्चा सुरू होती.
निवडणूक आयोगाकडे या दोघांनी आपली बाजू मांडू नये असे नमूद केले असले तरी पूर्वी अजित पवार हयात असतानाच त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोगामध्ये तटकरे पक्षाची भूमिका मांडत असत. सध्या पक्षाच्या मान्यतेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात चर्चेला आहे. त्याचवेळी नव्या पत्राचा अर्थ काय अशीही विचारणा होते आहे.
सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांची चर्चा
बुधवारी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट झाली. सुमारे एक तास हे दोघेही नेते बंद दरवाजाआड चर्चा करत होते.त्यानंतर लगेचच हे पत्र समोर आले. बुधवारी रोहित पवार यांनीही अजित पवार राष्ट्रवादीवर आरोप करत पटेल आणि तटकरे यांनी हा पक्ष हाती घ्यायचा प्रयत्न केला होता असा आरोप केला होता. त्याच दिवशी हे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही डोमकावळ्यांचे आमच्या पक्षात अकारण लक्ष
सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना या विषयावर आपल्याला काहीही बोलायचं नाही असे सांगितले. मात्र काही डोमकावळे आमच्या पक्षाच्या कारभारात अकारण लक्ष देत आहेत, आधी त्यांनी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे ते पहावे असेही विधान केले. रोहित पवार यांचे पटेल-तटकरे यांच्याशी पटत नसताना आता अजित पवार कुटुंबीयही या दोन्ही नेत्यांवर अविश्वास दाखवत आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.