नरेश कदम
मुंबई: विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुनेत्रा पवार गटाच्या नेत्यांमधील वाद मिटविताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची डोकेदुखी वाढली आहे, तर या गटातील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे मध्यस्थाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूच्या दुःखातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सावरल्या असल्या तरी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी दूर करण्यात डोकेदुखी वाढत आहे. सुरुवातीला काही महिने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे असलेली पक्षाची सूत्रे आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत १७ पैकी तीन जागा सुनेत्रा पवार गटाच्या वाट्याला आल्या होत्या. त्यात पुण्याची जागा विक्रम कोकाटे यांना देण्यात आली. कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड ही जागा कोकणातील एका धरण बांधकाम व्यावसायिकाला देण्याचे ठरत होते.
पण पुण्याप्रमाणे ही जागा व्यावसायिकाला दिली तर टीका होईल, असा सल्ला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना देण्यात आला, त्यामुळे सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली. यात तटकरे यांची नाराजी दूर करण्याचाही उद्देश होता.
दुसरीकडे राज्यसभेच्या जागेसाठी सुरुवातीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आले होते. पण मी राज्यसभेवर जाईन, पण राज्याच्या सत्तेत माझा पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्री करा, अशी अट भुजबळ यांनी घातली होती. पण समीर भुजबळ यांचा पूर्वइतिहास भाजपच्या नेतृत्वाला माहीत असल्याने, तसेच अजून ईडीच्या केसेस अजून फाईल बंद झालेल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावास नकार देण्यात आला.
त्यामुळे भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातच राहतील. भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांना राज्यसभेच्या जागेसाठी विचारले होते, मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी, त्यांचे समर्थक राजेंद्र जैन यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले.
मात्र यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र या दोन नेत्यांपेक्षा आता सुनेत्रा पवार या दिलीप वळसे-पाटील यांच्याशी पक्षाच्या धोरणात्मक बाबींबाबत चर्चा करतात. मध्यंतरी दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत समन्वय ठेवण्याचे काम ते करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यामुळे, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थखाते दिलीप वळसे पाटील यांना दिले जाऊ शकते, अशी या गटात चर्चा आहे.