पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना पक्षाने अगदी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिला. यानंतर मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, नवाब मलिक यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मलिक यांनी म्हटले आहे की, "मी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होताच शिवसेना आणि भाजप दोघेही विरोध करतील हे स्पष्ट होते. पण ज्याप्रकारे पक्षाने माझ्यावर शेवटच्या क्षणी विश्वास दाखवला, एबी फॉर्म पाठवला आणि मला पक्षाचा उमेदवार बनवले. यामुळे मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार...", असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक यांनी आपल्याला विरोध झाला तरी आपण निवडणूक भरणार असल्याचे म्हटले होते. मंगळवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यानी म्हटले होते की, "मी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मी अपक्ष उमेदवार म्हणूनही फॉर्म भरला होता. पण पक्षाने अखेरच्या क्षणी मंगळवारी (दि.२९) दुपारी २.५५ वाजता एबी फॉर्म पाठवला आणि आम्ही तो सादर केला. आता मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असल्याचे नवाब मलिक यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मानखुर्द शिवाजीनगर येथील उमेदवार नवाब मलिक यांच्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले, "४ नोव्हेंबरपर्यंत कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल." याआधी गुरुवारी मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी, "अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट द्यायला नको होते.'' असे म्हटले होते.