ST Bus Stand Hirkani Kaksh Pudhari
मुंबई

ST Bus Stand Hirkani Kaksh: स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय; राज्यात तीन वर्षांत १२५ ‘हिरकणी कक्ष’

स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करता यावे यासाठी महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांवर तीन वर्षांत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

राज्यातील एसटी बसस्थानकांवर तीन वर्षांत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार असून, यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते.

महिला प्रवाशांना, विशेषतः स्तनदा मातांना प्रवासात बाळाची निगा राखताना अनेकदा खासगी जागेअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते.

ही अडचण लक्षात घेऊन एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मातांना बाळाला स्तनपान करण्यासह त्याची आवश्यक निगा राखण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक दायित्व निधी उपक्रमातून या कक्षांची उभारणी केली जाईल.

साधारण तीन मीटर बाय तीन मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारले जाणार असून, त्यामध्ये आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश असेल. उपलब्ध जागा, स्थानिक गरजा आणि सामाजिक दायित्व धोरणानुसार या संख्येत आवश्यक बदल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

एसटीकडे देखभालीची जबाबदारी

कक्ष उभारणीसाठी एसटी महामंडळाकडून सुमारे पाच मीटर बाय पाच मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वीज, पाणी, स्थापनेसाठी आवश्यक सहकार्य आणि शासकीय परवानग्या मिळविण्याची जबाबदारी एसटीची असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारीही महामंडळाचीच राहणार आहे.

या प्रकल्पासाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान अपेक्षित नसून, संपूर्ण उभारणी सीएसआर निधीतून होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT