SpiceJet Flight Cancellation pudhari photo
मुंबई

SpiceJet Flight Cancellation : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटचा गोंधळ; १२ विमाने रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

सर्वाधिक फटका मुंबईतून पाटणा, गोरखपूर, दिल्ली, बंगळुरू, वाराणसी, जयपूर आणि उदयपूर यांसारख्या प्रमुख देशांतर्गत शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ वर स्पाइसजेट एअरलाइन्सच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागले. कंपनीची सुमारे १२ नियोजित उड्डाणे अचानक रद्द झाली आणि उड्डाणांना विलंब झाल्याने शेकडो प्रवासी तासन्‌तास विमानतळावर अडकून पडले.

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून मुंबई विमानतळावरून स्पाइसजेटच्या एकाही विमानाने उड्डाण केले नाही. तब्बल १२ तासांहून अधिक काळ ही विमानसेवा पूर्णपणे ठप्प राहिली. या गोंधळाचा सर्वाधिक फटका मुंबईतून पाटणा, गोरखपूर, दिल्ली, बंगळुरू, वाराणसी, जयपूर आणि उदयपूर यांसारख्या प्रमुख देशांतर्गत शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला.

पाटणा आणि गोरखपूर मार्गावरील विमाने रद्द झाल्याने प्रवाशांनी विमानात आणि काउंटरवर ठिय्या आंदोलन केले. विमानांच्या सुधारित वेळेबाबत किंवा पर्यायी व्यवस्थेबाबत कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा समावेश होता. पिण्याचे पाणी आणि खाण्याचीही योग्य सोय नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • स्पाइसजेट कंपनी सध्या गंभीर आर्थिक आणि तांत्रिक संकटाचा सामना करत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचे समजते. कंपनीने प्रवाशांना ७ दिवसांत तिकिटाचे पूर्ण पैसे परत देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT