मुंबई : सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे अश्लील मॉर्फ केलेले फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. आर्यन दीपक जैन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटकेच्या वेळेस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
गेल्या काही वर्षांत तरुणींसह महिलांचे सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो चोरी करून ते फोटो आणि व्हिडीओ एआयच्या माध्यमातून मॉर्फ करून त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनविले जाते. ते फोटोसह व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून त्यांची बदनामी केली जाते. अशाच प्रकारे सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केले होते. तिच्या बदनामीचा प्रयत्न केला होता.
सोनाक्षी ही तिच्या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहत असून तिच्या निदर्शनास संबंधित अश्लील मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ आले होते. सोशल मीडियावर अपलोड झालेले तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने वांद्रे पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरून अज्ञात व्यक्तीने ते फोटो आणि व्हिडीओ दिल्ली येथून सोशल मीडियावर अपलोड केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे एक पथक दिल्लीला पाठविण्यात आले होते.या पथकाने आर्यन जैन याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच मॉर्फ अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून सोनाक्षी सिन्हाच्या बदनामीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.