मुंबई : वेतन कपात केली, तरी माघार घेणार नाही, असा पवित्रा घेत विविध शिक्षक संघटनांनी शुक्रवारी राज्यभरामध्ये आंदोलन केले. टीईटी सक्ती, शिक्षक समायोजन आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या आंदोलनाकडे शिक्षकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. आंदोलनादरम्यान शुक्रवारी राज्यातील फक्त एक टक्का शाळाच बंद ठेवण्यात आल्याचे समोर आले. तर 13 हजार 216 शिक्षक विनापरवानगी अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे.
राज्यामध्ये 24 हजार 490 खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आहेत. या शाळांमध्ये 2 लाख 24 हजार 366 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. शुक्रवारी पुकारलेल्या आंदोलनामुळे फक्त 2 हजार 539 शाळाच बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये 11 जिल्ह्यांमधील सर्व शाळा सुरू होत्या. त्याचप्रमाणे 13 हजार 216 शिक्षक हे विनापरवानगी शाळेत अनुपस्थित राहिले होते. शाळा बंद ठेवण्याचे प्रमाण हे एकूण शाळांच्या तुलनेत फक्त एक टक्का तर शिक्षक अनुपस्थित राहण्याचे प्रमाण हे सहा टक्के इतके होते. त्याचप्रमाणे 11 हजार 329 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे परवानगीने रजेवर होते.
राज्यातील आठ विभागांपैकी कोल्हापूर विभागात सर्वाधिक 848 शाळा बंद होत्या. कोल्हापूर विभागातील 2 हजार 894 शाळा आहेत. तसेच 28 हजार 667 शिक्षकांपैकी 6 हजार 404 शिक्षक गैरहजर होते. त्याखालोखाल नाशिक विभागातील 2 हजार 592 शाळांपैकी 473 शाळा बंद होत्या. तसेच 16 हजार 678 शिक्षकांपैकी 2 हजार 641 शिक्षक गैरहजर होते.
छत्रपती संभाजी नगर विभागातील 6 हजार 903 शाळांपैकी 419 शाळा बंद होत्या. तर 24 हजार 794 शिक्षकांपैकी 196 शिक्षक गैरहजर होते. पुणे विभागातील 3 हजार 151 शाळांपैकी 394 शाळा बंद होत्या. तर 46 हजार 948 शिक्षकांपैकी एकही शिक्षक विनापरवानगी गैरहजर नव्हता. मात्र 3 हजार 949 शिक्षक हे परवानगी घेऊन रजेवर होते.
नागपूर विभागातील 2 हजार 117 शाळांपैकी 222 शाळा बंद होत्या. तर 22 हजार 388 शिक्षकांपैकी 1 हजार 323 शिक्षक गैरहजर होते. अमरावती विभागातील 2 हजार 853 शाळांपैकी 108 शाळा बंद होत्या. तर 20 हजार 341 शिक्षकांपैकी 1 हजार 895 शिक्षक गैरहजर होते. लातूर विभागातील 1 हजार 553 शाळांपैकी 66 शाळा बंद होत्या. तसेच 16 हजार 824 शिक्षकांपैकी एकही शिक्षक गैरहजर नव्हता. तसेच धाराशिवमध्ये आचारसंहिता असल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मुंबई विभागातील 2 हजार 427 शाळांपैकी मुंबई उत्तरमधील 6, मुंबई दक्षिणमधील 1 व रायगडमधील 2 शाळा अशा 9 शाळा बंद होत्या. तर 29 हजार 250 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 757 कर्मचारी गैरहजर होते.