Koparkhairane slab collapse pudhari photo
मुंबई

Koparkhairane slab collapse : कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा कोसळला स्लॅब : मोठी दुर्घटना टळली

दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस; रहिवाशांचे तातडीने स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : कोपरखैरणे सेक्टर-१८ येथील अथर्व सोसायटीतील ३० वर्षे जुन्या इमारतीत बुधवारी सायंकाळी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून तो थेट दुसऱ्या मजल्यावरील घरात पडल्याची घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेवेळी दोन्ही फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहितीनुसार,इमारतीतील ३०२ क्रमांकाच्या फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि रहिवाशांनी तत्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी स्लॅबचा काही भाग पडल्याची घटना घडली होती. तरीही इमारतीचा वापर सुरूच असल्याचे समोर आले आहे.

ही इमारत ३० वर्षांहून अधिक जुनी असून, दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने सोसायटीला स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र आवश्यक कार्यवाही वेळेत न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे.

घटनेनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रहिवाशांचे अण्णासाहेब पाटील सभागृहात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून इमारतीचा वीज व पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे, अशी माहिती विभाग अधिकारी भरत धांडे यांनी दिली.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोपरखैरणेतीलच एका इमारतीमधील केक शॉपचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सलग घडलेल्या या घटनांमुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अशा इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT