मुंबईत दोन अपघातांत सहा जण ठार File Photo
मुंबई

मुंबईत दोन अपघातांत सहा जण ठार; चेंबूर-आरेमध्ये तिघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चालकाने मद्यधुंद अवस्थेत धूम स्टाईलने चालवलेली क्वालिस गाडी उभ्या असलेल्या टँकरवर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १:५० च्या दरम्यान चेंबूरच्या गव्हाणपाडा डी. बी. पाटील मार्गावर घडली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.

चेंबूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे क्वालिसचा अपघात; तिघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या गव्हाणपाड्यावरून वाशीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या क्वालिस गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरवर जावून आदळली. क्वालिस गाडीमध्ये चालकासह एकूण सहाजण प्रवास करत होते. त्यातील हरीचंदन दिलीप दास (२३), प्रमोद शंकर प्रसाद (३५), हुसेन शेख (४०) या तिघांचा जागीच मृत्य झाला.

तिघेही चेंबूरच्या शंकर देऊळ परिसरात राहणारे होते. तर गाडीचा चालक जावेद सैफुला खान (३०) राहणार लक्ष्मी नगर, मनोज मनी करंटम (३०) रा. लक्ष्मी नगर, संजय सुखर सिंग (३९) रा. शंकर देऊळ हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शताब्दी व सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान यातील चालकासह सर्वांनी मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, क्वालिस चालक धूम स्टाईलप्रमाणे गाडी चालवत होता. सुदैवाने अपघात झाला तेव्हा रस्त्यावर लोकांची रहदारी नव्हती अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. याप्रकरणी चालक जावेद सैफुला खान याच्या विरोधात आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरेमध्ये दुचाकी खांबावर आदळल्याने तीन तरुण मृत्युमुखी

गोरेगाव : आरे कॉलनी येथे घडलेले हिट अँड रन प्रकरण ताजे असताना याच परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात घडला. बिरसा मुंडा परिसरात दुचाकी खांबावर आदळून तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघे जागीच ठार झाले तर तिसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. राधेश्याम दावंडे ( वय ३४), विवेक राजभर (वय २४), आणि रितेश सालवे (वय २७) अशी त्यांची नावे असून हे तिघेही आरे परिसरातच राहात होते. या प्रकरणाचा आरे सब पोलीस ठाण्याने तपास सुरू केला आहे.

हे तिघे शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास दुचाकीवरून गोरेगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीने खांबाला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण दूरवर फेकला गेला. तर उर्वरित दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तिसरा मित्र गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांनी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. आरे परिसरात या घटनेमुळे शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT