मुंबई : महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक ‘स्मार्टनेव्ह’ तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर केला. यामुळे रुग्णांवर कमी वेळेत शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान इम्प्लांट योग्य जागी बसला आहे की नाही हे प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळीच स्क्रीनवर दिसत असल्याने रेडिएशनचा धोका नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे सुमारे अर्धा तास ते चाळीस मिनिटे वेळही वाचणार आहे.
या शस्त्रक्रियेसाठी सीआर्मद्वारे एक्सरे काढून इम्प्लांटची स्थिती तपासावी लागत असे. त्यासाठी ऑपरेशन थिएटर रिकामे करणे, रेडिएशनपासून बचावासाठी लेड एप्रन वापरणे आणि योग्य अँगल मिळवण्यासाठी अनेकदा शूट्स घ्यावे लागत. या प्रक्रियेमुळे वेळ वाढत असे. आता स्मार्टनेव्हमुळे इम्प्लांट कॉक्लियामध्ये कोणत्या गतीने आणि किती स्मूथरीत्या जात आहे हे रिअलटाइम स्क्रीनवर दिसते. ‘ऑटो एनआरटी’ सुविधेमुळे नसांच्या प्रतिक्रियेची तपासणीही जलदगतीने होते. तीन वर्ष व त्याखालील मुलांना ही सुविधा सायन रुग्णालयात मोफत देण्यात येत आहे.
अडीच वर्षाच्या आदिशावर शस्त्रक्रिया
अंटोपहिल येथे राहणाऱ्या अडीच वर्षाच्या आदिशावर सायन रुग्णालयात स्मार्टनेव्ह तंत्रज्ञानासह कोक्लीअर इम्प्लांट केले असून ती पहिली बालरुग्ण ठरली. सुरुवातीला आदिशा बोललेल्या कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या कुटुंबियानी तिला विविध डॉक्टरांकडे दाखविले. शेवटी सायन रुग्णालयात दाखविण्याचा निर्णय घेतला. आणि जन्मत:च श्रवणदोषचे निदान झाले. आदिशाला अडीच वर्षांच्या वयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेत सहभागी झालेली डॉक्टरांची टीम
ही शस्त्रक्रिया डॉ. क्षितिज शाह (प्राध्यापक, ईएनटी), डॉ. मनीष प्रजापती (सहाय्यक प्राध्यापक, ईएनटी) डॉ. अनघा जोशी (प्राध्यापक, ईएनटी), डॉ. रेणुका ब्राडो (प्राध्यापक व विभागप्रमुख, ईएनटी) सहभागी झाले होते. भूलतज्ज्ञ विभागातील डॉ. कंचन रुपवटे आणि डॉ. शीतल नायक यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.