घाटकोपर: नमाजचे कारण देत पोलिसांनी रामनवमीला शोभायात्रा रोखल्याने सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. मंगळवारी समाजाच्यावतीने चेंबूर येथील अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी शेकडो आंदोलकांची धरपकड केली. यामुळे काहीकाळ तणाव वाढला होता.
रामनवमीनिमित्त घाटकोपर आणि विक्रोळी पार्कसाईट येथे हिंदू समाजाच्यावतीने शोभायात्रा काढल्या होत्या. यावेळी पोलिसांनी नमाजचे कारण देत या शोभायात्रा रोखल्याचा सकल हिंदू समाजाचा आरोप आहे.
याबाबत पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सहावेळा नमाज असेल तर सहावेळा यात्रा रोखली जाईल असे उत्तर दिल्याने संताप व्यक्त होत आहे. पाटील यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मंगळवारी हा मोर्चा काढण्यात आला.
आंदोलक माहुल रस्त्यावर कार्यालयासमोर येताच पोलिसानी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. मोर्चामध्ये जैन मुनी निलेशचंद्र, केदारनाथ धाम सद्गुरू डॉ. दयानिधी महाराज व विश्वहिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री मोहन साळेकरही सहभागी झाले होते.
पोलिसानी त्यांना ताब्यात घेऊन गोवंडी पोलीस ठाण्यात नेले. मात्र दोन तासांनी त्यांना सोडून देण्यात आले. नंतर ते आरसीएफ येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करीत रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. मात्र अप्पर पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.