मुंबई : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणार्या कर्नाक पुलाचे आता ‘सिंदूर पूल’ असे नामकरण करण्यात आले आहे. उद्या (दि.10) या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचा कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे. 150 वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वेने ऑगस्ट 2022 मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या पुलाचे बांधकाम करण्यात आले.
सिंदूर सदर पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी 230 मीटर असून पूर्वेस 130 मीटर व पश्चिमेस 100 मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीसाठी आरसीसी आधारस्तंभावर प्रत्येकी 550 मेट्रिक टन वजनी 70 मीटर लांब, 26.50 मीटर रूंद आणि 10.8 मीटर उंचीच्या दोन तुळया स्थापित करण्यात आल्या आहेत. आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने सिंदूर पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामे पूर्ण झाली आहेत. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भारचाचणी घेण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते, मार्गिकेवरील काँक्रिट, मास्टिक, अपघातरोधक अडथळा, रंगकाम आणि मार्गरेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पूल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे. आता फक्त लोकार्पण झाल्यानंतर सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.