Siddhivinayak Temple Pudhari
मुंबई

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक परिसराचे सुशोभीकरण रखडले! 93 कोटींचा प्रकल्प अजूनही सुरू नाही

वर्कऑर्डर देऊन चार महिने झाले तरी काम सुरू होत नसल्याने तर्कवितर्क

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसराचे सुशोभीकरण तातडीने व्हावे, यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली. मात्र कामाचा शुभारंभ झालेला नाही. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र चार महिन्यांनंतरही काम सुरू न झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुंबईकरांसह देशभरातील नागरिकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे सुशोभीकरण 93 कोटी 89 लाख 52 हजार रुपये खर्च करून करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामात भूमिगत पार्किंगही उभारले जाणार आहे.

हे काम तातडीचे असल्यामुळे या कामाची निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची डिसेंबर महिन्यामध्ये निवड करण्यात आली. एवढेच नाही तर सुशोभीकरणाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी कंत्राटदाराला डिसेंबरमध्ये कामाचे आदेशही देण्यात आले. 15 डिसेंबर 2025 पासून काम होणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत या कामाचा शुभारंभ झालेला नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मुंबईतील अनेक विकास कामांच्या उद्घाटनाला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरण शुभारंभाला वेळ का देत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य भक्तांना पडला आहे.

एखाद्या कामाला मुंबई महानगरपालिकेने वर्कऑर्डर दिल्यानंतर ते काम तातडीने सुरू होते, मात्र सिद्धिविनायक सुशेोभीकरणाचे काम रखडले आहे. या मागचे कारण काही वेगळेच असल्याचेही आता बोलले जात आहे. याबाबत सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांना संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

महापालिका अधिकारीही संभ्रमात

कामाची वर्क ऑर्डर देऊनही काम सुरू होत नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारीही संभ्रमात सापडले आहेत. सुशोभीकरणाचे काम 730 दिवसांत पूर्ण करण्याची कंत्राटदाराला मुदत देण्यात आली आहे. परंतु 4 महिने काम रखडल्यामुळे या मुदतीत काम करणे आता शक्य होणार नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT