मुंबई: कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा निकटवर्तीय मानला जाणारा सलीम इस्माईल डोला याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ड्रग्ज तस्करीतून मिळालेला पैसा हवाला, शेल कंपन्या आणि बेनामी व्यवहारांच्या माध्यमातून पांढरा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
या प्रकरणात डोंगरीतील फैसल जावेद शेख, त्याची पत्नी अल्फिया शेख आणि अन्य दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
तपासानुसार, फैसल शेख हा सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कमधील प्रमुख दुवा होता. दरमहा सुमारे ४० किलो मेफेड्रोन (एमडी) पुरवठा डोलाच्या नेटवर्कमधून होत असल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने न्यायालयात केला आहे. या अमली पदार्थांची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
गुजरातमधील गुप्त प्रयोगशाळांमध्ये मेफेड्रोनची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा पुरवठा, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरातसह विविध राज्यांत वितरण आणि हवालामार्फत आर्थिक व्यवहारांची साखळी उघड झाली आहे.
मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने सलीम डोलाविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. एप्रिल २०२६ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले. मुंबईत आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या चौकशीत ड्रग्ज तस्करीच्या आर्थिक साखळी, हवाला व्यवहार, बेनामी मालमत्ता आणि भारतातील सहकाऱ्यांविषयी महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे परदेशापर्यंत, विशेषतः दुबईपर्यंत पोहोचल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने परदेशातील मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची माहितीही ईडी गोळा करत आहे. आरोपपत्रानंतर या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असून, आणखी काही व्यक्तींना आरोपी करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
डोलाच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीची टाच
ईडीने या प्रकरणात सुमारे ५.८८ कोटी रुपये किमतीच्या सात स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. या मालमत्ता फैसल जावेद शेख, त्याची पत्नी अल्फिया शेख आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये मुंबईतील निवासी फ्लॅट, व्यावसायिक गाळे आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.
याशिवाय छाप्यांमध्ये सुमारे १ कोटी३० लाख रुपयांची रोख रक्कम, सोने, परकीय चलन, बँक खात्यांची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले. दुबईसह परदेशातील मालमत्तांचाही तपास सुरू आहे. या आर्थिक साखळीतील आणखी लाभार्थी आणि मालमत्ता ईडी शोधत आहे.
सलीम डोला कोण?
डॉन दाऊद इब्राहिमचा प्रभाव असलेल्या डोंगरी परिसरातून गुन्हेगारी विश्वात सक्रिय झालेला सलीम इस्माईल डोला हे गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीतील मोठे नाव मानले जाते. भारतातून फरार झाल्यानंतर तो १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा निकटवर्तीय म्हणून तपास यंत्रणांच्या रडारवर आला. त्याने दुबई आणि इतर देशांतून मेफेड्रोन तस्करीचे जाळे उभे केले. या नेटवर्कद्वारे महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांत अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले.