मुंबई: मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत लढत राहू,असा निर्धार शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे सोमवारी केला.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या प्रवेशद्वारावर शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि कॉक्रोच जनता पार्टी यांनी केलेल्या आंदोलनांमुळे वातावरण तापले.
दरम्यान, आंदोलनात पोलिसांनी कोणत्याही कार्यकर्त्यावर कारवाई केली नाही. दरम्यान, मनसेतर्फे दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एसआयआरविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी याठिकाणी येऊन स्वाक्षरी केली.
दरम्यान, सोमवारी दुपारपासून शिवसेना (उबाठा),मनसे आणि सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी येऊ लागले. तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात तिरंगा घेऊन त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. काही शिवसैनिकांनी काळी पँट आणि काळा शर्ट परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला होता.
“वोट चोर, गद्दी छोड़”, “सारे चोर कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में”, “ज्ञानेश कुमार चोर है, चोर है”, “दिल्ली पोलीस हाय हाय”, “हमारी एकता जिंदाबाद” आणि “आवाज दो, हम एक हैं” “इन्कलाब जिंदाबाद” आणि “लढेंगे, जितेंगे” या घोषणाही देण्यात आल्या. तसेच “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…”या गीताच्या ओळींमधून कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
‘दडपशाही चालू देणार नाही’, ‘लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया’, असा संदेश यावेळी दिला गेला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार वरुण सरदेसाई ,आमदार महेश सावंत,आमदार अजय चौधरी,मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार,माजी खासदार राजन विचारे, माजी महापौर विशाखा राऊत,किशोरी पेडणेकर व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
ठिय्या आंदोलनाबद्दल आदित्य, अमित ठाकरेंसह २५ जणांवर गुन्हा
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आमदार वरुण सरदेसाई, आमदार महेश सावंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती सोमवारी वृत्तसंस्थेने दिली असली तरी एफआयआरमध्ये कोणाची नावे आहेत, याची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.