CKP Hall Auction Pudhari
मुंबई

CKP Hall Auction शिवाजी पार्कमधील सीकेपी हॉल लिलावाच्या वाटेवर; साडेआठ कोटींचे कर्ज थकल्याने बँकेची नोटीस

शिवाजी पार्क येथील सीकेपी हॉलच्या पुनर्विकासासाठी घेतलेल्या सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड थकल्याने ठाणे भारत सहकारी बँकेने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पुनर्विकासासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्याने ठाणे भारत सहकारी बँकेने शिवाजी पार्क येथील सीकेपी हॉल लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समाजाचा मानबिंदू असलेल्या वास्तूचा लिलाव करण्याची वेळ आल्याने सीकेपी समाजात अस्वस्थता पसरली असून लिलावापासून ही वास्तू वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीकेपी हॉलच्या व्यवस्थापन समितीने सभागृहाच्या पुनर्विकासासाठी ठाणे भारत सहकारी बँकेकडून सुमारे साडेआठ कोटी  रुपयांचे कर्ज घेतले आहे.

या कर्जातून सीकेपी हॉलची पाच मजली अर्धवट इमारत उभी राहिली. पुढे कर्जाची परतफेड करण्यात अडचणी निर्माण झाल्या. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने मालमत्ता लिलावात काढयाची नोटीस जारी केली आहे.

ठाणे भारत सहकारी बँकेचे साडेआठ कोटी रुपयांचे कर्ज आणि मुंबई महापालिकेची २ कोटी २७ लाख ५३ हजार ८४३ रुपये थकबाकी, अशी एकूण सुमारे १२ ते १३ कोटी रुपयांची देणी भागविण्यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीला काढण्याची वेळ आल्याने सीकेपी समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या जप्ती नोटिशीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र आता बँँकांनी या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळानंतर संस्थेची आर्थिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी संस्थेचे विश्वस्त विजय वैद्य यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता तो होऊ शकला नाही.

करोनाकाळात अर्धवट राहिलेले बांधकाम, बँकेचे थकलेले हप्ते यामुळे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे बँकेची १५०० चौरस फुटांची जागा विकण्याचा प्रस्ताव मी ऑगस्ट २०२३ रोजी मांडला होता. त्यातून किमान १० कोटी रुपये त्यावेळी उभे राहू शकले असते.

मात्र सभासदांनी विरोध केला. विरोधकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी अन्य पर्याय सुचवणे अपेक्षित होते. केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. त्यामुळे एप्रिल २०२४ रोजी मी कंटाळून राजीनामा दिला.
- ॲड. नचिकेत जयवंत, माजी अध्यक्ष
हाॅलचा पुनर्विकास करण्यासाठी ठाणे भारत सहकारी बँकेकडून घेतलेल्या साडे आठ कोटींच्या कर्जाची परतफेड करता करता सीकेपी सभेच्या व्यवस्थापन मंडळाच्या नाकी नऊ आले आणि त्यामुळे पुनर्विकासात सीकेपी हॉलची अर्धवट उभी राहीलेली पाच मजली इमारत किमान ३५ कोटींची बोली लावून विक्रीला काढली आहे. शिवाजी पार्कसारख्या मोक्याच्या जागी असणारी ही जागा कोणीही ३५-३६ कोटी देऊन सहज विकत घेईल.
- ॲड. शिरीष देशपांडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT