Shiv Sena UBT Split: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांदरम्यान आता या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाल्याचं बोललं जात आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 6 खासदारांच्या संभाव्य विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या पत्रावर अद्याप सर्व सह्या झालेल्या नाहीत. विशेषतः खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही नेत्यांच्या सह्या अंतिम पत्रावर नसल्याने संपूर्ण प्रक्रिया सध्या थांबली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोन्ही खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजपची राजकीय ताकद मजबूत मानली जाते. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे, विशेषतः 2029 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी आणि राजकीय भवितव्य, हा त्यांच्यासमोरील महत्त्वाचा मुद्दा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून स्पष्ट आश्वासन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संभाव्य फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काही खासदार आणि आमदारांशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संवाद सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे. आगामी काळात या चर्चांमधून नेमका कोणता निर्णय समोर येतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटानेही आपल्या नेत्यांशी संपर्क वाढवला असून पक्षातील असंतोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संभाव्य फुटीची चर्चा असली तरी अंतिम निर्णय होईपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिवसेनेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काही दिवसांत होणाऱ्या हालचाली राज्याच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतात.