Uddhav Thackeray Eknath Shinde file photo
मुंबई

Shiv Sena-UBT crisis: ठाकरे सेना बैठकीला अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने आत्ता पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena-UBT crisis

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार अखेर शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. शिवसेना 'उबाठा' पक्षाने लोकसभेतील आपल्या संसदीय पक्षाची बैठक आज बोलावली होती. त्यात उपस्थित राहण्यासाठी 'व्हिप' (पक्षादेश) देखील जारी करण्यात आला होता. मात्र बैठकीला ६ खासदार गैरहजर राहिल्याने पक्षफुटीचे चित्र स्पष्ट झाले. आता ठाकरे गटाने बैठकीला अनुपस्थित असलेल्या या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.

या खासदारांना नोटीस पाठवली जाणार

लोकसभा अध्यक्षांच्या संसदीय प्रक्रियेच्या नियमांनुसार, संसदेतील पक्षाच्या नेत्याला बैठक बोलावण्याचा आणि त्यासाठी 'व्हिप' जारी करण्याचा अधिकार आहे. याच तरतुदीचा वापर करत ठाकरे गटाने बंडखोर गटाच्या खासदारांच्या संसदीय सदस्यत्वावर टांगती तलवार ठेवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी संसदीय दलाच्या बोलावलेल्या या बैठकीला बंडखोर गटाचे खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यांना आता पक्षाकडून 'कारणे दाखवा' नोटीस बजावली जाणार आहे. त्यांच्या उत्तराने जर पक्षाचे समाधान झाले नाही, तर त्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांकडे केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांचे खासदारकीचे पद धोक्यात येऊ शकते.

यामध्ये खालील खासदारांचा समावेश आहे.

संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम

संजय दिना पाटील – मुंबई उत्तर-पूर्व

संजय जाधव – परभणी

नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली

भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी

ओमराजे निंबाळकर - धाराशिव

मंगळवारी रात्रीपासून 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चाना पेव फुटले होते. अखेर बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंचे ६ खासदार सोबत घेत 'ऑपरेशन टायगर' यशस्वीपणे पार पाडल्याचे समजते. त्यानुसार, ६ खासदारांनी एक गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आवश्यक पत्रांची जुळवाजुळव अद्याप झालेली नाही. शिंदेंच्या गळाला लागलेल्या ६ पैकी २ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या पत्रावर अद्याप सही केली नाही.

दिल्लीतील एका हॉटेलात शिंदेंसोबत झाली गुप्त बैठक

शिवसेना ठाकरे गटाचे फुटणारे खासदार दिल्लीत दाखल झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबल्याचे समजते. हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. स्वतः एकनाथ शिंदे आणि या खासदारांमध्ये सविस्तर चर्चा झाली. एकनाथ शिंदे, फुटीर खासदार यांच्याव्यतिरिक्त आणखीही महत्त्वाचे लोक त्यांच्यासोबत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT