Shivsena Pudhari
मुंबई

Shiv Sena Mumbai Leadership: मुंबई शिंदे शिवसेनेची जबाबदारी चौघांवर!

मुंबईतील शिवसेनेच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेला श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टता दिली. मुंबईची जबाबदारी एकावर नसून चौघांवर असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईची जबाबदारी कोणावर यावरून गेल्या काही दिवसापासून शिवसेनेमध्ये वाद सुरू होता. अखेर शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी मुंबईची जबाबदारी कुणा एकावर नसून चौघांवर असल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले. त्यामुळे आता अंतर्गत वाद मिटणार की, सुरूच राहणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील शिवसेनेची जबाबदारी सुरुवातीपासून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. परंतु शिवसेनेत आमदार सचिन अहिर यांचा प्रवेश झाल्यानंतर मुंबईची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागले.

नगरसेवकांच्या प्रत्येक बैठकीला शेवाळे उपस्थित असले तरी, अहिरही आवर्जून उपस्थित असतात. ते नगरसेवकांना मार्गदर्शनही करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून काम करणाऱ्या शेवाळे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

ठाकरे गटात असताना सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहण्यात पसंती दिली होती. त्यामुळे शिंदे गटात येताच त्यांना विधान परिषदेचे सदस्य पदही देण्यात आले आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्यात आले.

एवढेच नाही तर मुंबई शहरासह मुंबई महानगरपालिकेची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे सुरुवातीपासून मुंबईची जबाबदारी सांभाळणारे राहुल शेवाळे समर्थक नाराज झाले आहेत.

चौघांवर जबाबदारी

शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांना महापालिकेतील पत्रकारांनी याबद्दल छेडले असता ते म्हणाले, मुंबईतील सेनेची जबाबदारी कुणा एकावर नाही. चौघांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. राहुल शेवाळे, सचिन अहिर, योगेश कदम व निलेश राणे यांच्यावर सोपवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT