Mumbai Pune Highway Pudhari
मुंबई

Mumbai Pune Road: भविष्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ठप्प झाल्यास चिंता मिटणार, हा मार्ग ठरणार पर्याय; सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway: नव्या मार्गाला मिळणार गती; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कोंडीवर उतारा

पुढारी वृत्तसेवा

Karjat Shirur Highway alternative to Mumbai Pune Expressway

मुंबई : दिलीप सपाटे

पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत या नव्या मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्याला पर्याय म्हणून हा रस्ता तयार केला जात आहे. या महामार्गावर दोन दिवस झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहता राज्य सरकार या नव्या मार्गाला गती देणार असल्याचे समजते.

शिक्रापूर-चाकण-तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे शिरूर- कर्जत हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

सध्या मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव-लोणावळा या मार्गे मुंबईला जावे लागते. आता पर्यायी मार्ग म्हणून कर्जत - शिरूर महामार्ग तयार केला जात आहे.

मल्टिमोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, तो चारपदरी असणार आहे. त्याची एकूण लांबी 135 किलोमीटर एवढी आहे. त्यासाठी साडेबारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक खर्चही कमी होणार आहे.

या महामार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

  • या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटर लांबीचा आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 75 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.

  • या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 670 हेक्टर जागेचे संपादन केले जाईल. या मार्गावर पाच बोगदे, सहा मोठे पूल, तर 48 लहान पूल बांधले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT