मुंबई : भाजपा शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी होणार असल्यामुळे शिवसेनेचा गटनेताच राहणार नाही. त्यामुळे नियमानुसार मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालय मिळू शकणार नाही. परिणामी शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना भाजपाच्या पक्ष कार्यालयात बसावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रत्येक पक्षाच्या गटाला पक्ष कार्यालय दिले जाते. आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम या पक्षाने आपल्या गटाची नोंदणी करून गटनेत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांना पक्ष कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर आलेल्या भाजपा व शिवसेनेने अद्यापपर्यंत आपल्या नगरसेवकांचा गट स्थापन केलेला नाही. येणाऱ्या काही दिवसात हा गट स्थापन करण्यात येणार आहे. मात्र भाजपा शिवसेना नगरसेवकांचा एकत्र गट स्थापन केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीच्या गटाला एकच कार्यालय मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा गटामध्ये शिवसेनेचे नगरसेवक दाखल होणार असल्यामुळे भाजपाला कार्यालय मिळणार आहे. तर शिवसेनेचा स्वतंत्र गट नसल्यामुळे त्यांना पक्ष कार्यालय मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपाचे पक्ष कार्यालय वापरावे लागणार आहे. पक्ष कार्यालय मिळाल्यानंतर भाजपाने ठरवले तर पक्ष कार्यालयातील काही जागा ते शिवसेना नगरसेवकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे शिवसेना गटनेता नसला तरी उपगटनेता, प्रवक्ता यांची नेमणूक करू शकतो.
भाजपा शिवसेना एक गट झाल्यावर शिवसेनेचा गटनेता राहणार नाही त्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेतेच्या बैठकीत शिवसेनेला स्थान मिळणार नाही. मात्र भाजपाने शिवसेनेसाठी सभागृह नेता पद सोडल्यास त्यांना गटनेता बैठकीत सहभागी होता येणार आहेत. त्याशिवाय सभागृह नेता म्हणून स्वतंत्र दालन व कार्यालयीन मिळणार आहे. पण हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून आहे.