BJP Shiv Sena Pudhari News Network
मुंबई

Ambarnath Shiv Sena BJP: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप दुरावा कायम; स्वतंत्र बैठकींमुळे वाढली राजकीय तणावाची धार

शिवसेना नगरसेवकांची झाली मुख्याधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक; उपनगराध्यक्ष सदाशिव पाटलांनी मांडला अजब प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना-भाजची युती न झाल्याने दोन्ही पक्ष्यांच्या नगरसेवकांची बैठक देखील एकत्र होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत आहे. यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची नगरपालिकेत स्वतंत्र बैठक झाल्याने सोमवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील आपली स्वतंत्र बैठक मुख्याधिकारी यांच्या दालनात घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होत असताना, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी शहरातील विकासकांनी इमारत बांधकाम करताना त्या त्या प्रभागातील नगरसेवकांची एनओसी घ्यावी. असा प्रस्ताव मांडला. यावेळी शिवसेनेतील विकासक नगरसेवकांचा व सदाशिव पाटील यांचा सभेत चांगलाच वाद झाला.

राज्यात आणि देशात शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती असली तरी अंबरनाथमध्ये मात्र या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली नाही. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 23 नगरसेवक निवडून आले तर भाजपाला अवघ्या 14 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना भाजपामध्ये विलीन करून भाजपाने आपल्या संख्याबळाचा आकडा वाढवला आहे. तर थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपाने तेजश्री करंजुले-पाटील यांच्या रूपाने आपला उमेदवार निवडून आणला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी प्रथम भाजपाला व नंतर शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेना-भाजपातील संख्या बळाचा वाद ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू आहे. तेथेही तारीख पे तारीख सुरू आहे.

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्ष्यांचा संख्या बळाचा विषय प्रलंबित असल्याने स्थायी समिती व विषय समितीची निवड अजूनही झालेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली स्वतंत्र बैठक घेत आहेत. नुकतीच शिवसेनेचे गट नेते रविंद्र करंजुले यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या दालनात घेतली. यावेळी शहरातील कचरा, स्वछता, पथदिवे, रस्ते, फूटपाथ अश्या विविध नागरी समस्येवर चर्चा सुरू असताना उप नगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी विकासकांना इमारतीचा विकास करताना स्थानिक नगरसेवकांची एनओसी घ्यावी असा प्रस्ताव मांडला. मात्र यावर काही विकासक नगरसेवकांनी विरोध केल्याने शिवसेना नगरसेवकांमध्येच वाद रंगला. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता. याबाबत गटनेते रवींद्र करंजुले यांनी मात्र सदाशिव पाटील यांचा विषय अनौपचारिक होता. असे बोलून सारवासारव केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT