मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
मुंबई महानगरपालिकेचा फड सर्वाधिक महत्त्वाचा राजकीय सामना असेल हे निश्चित असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 50% वॉर्डांत आम्हाला लढण्याची संधी द्या, अशी मागणी भाजपच्या दिल्लीतील अतिवरिष्ठ नेत्यांकडे करायचे ठरवले आहे.
गुरुवारी मुंबई महापालिकेची रणनीती आखणाऱ्या राहुल शेवाळे यांनी सादर केलेल्या आकडेवारीनंतर शिंदे गटाने ही भूमिका घेतली असून, 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीत यासंबंधात चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधला आहे. बिहार विधानसभेचे उद्या निकाल लागणार असल्याने एनडीएच्या घटक पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आज शिंदे यांच्या निकटच्या सहकार्याशी चर्चा केली. 50 टक्के जागा मागण्यामागची कारणमीमांसा आज सविस्तर चर्चेत आणली गेली असे समजते.
मावळलेल्या सभागृहातील 65 नगरसेवक आमच्या पक्षात आले आहेत. शिवसेना हीच मुंबईतील मराठी मंडळींचा श्वास असल्याने येथे आम्हाला बरोबरीचा वाटा हवा, अशी पक्षाची भूमिका आहे.या 65 नगरसेवकांना त्यांच्या त्यागाचे बक्षीस द्यायला हवे, ते जनतेचे खरे प्रतिनिधी आहेत,असे स्पष्ट करताना यापूर्वी सन 2000 पासून नगरसेवक झालेले मुंबईतले जे नेते शिंदे गटात आले आहेत, ती संख्याच 124 असल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेची रणनीती ठरवण्यासाठी ज्या औपचारिक आणि अनौपचारिक बैठका झाल्या आहेत, त्यात पक्षाच्या समन्वय समितीने ही मागणी केली.
भारतीय जनता पक्ष आमच्या भावनांचा आदर करेल आणि आमची शक्ती लक्षात घेत योग्य त्या जागा देईल, असे शिवसेना शिंदे गटाचे म्हणणे आहे. शेवटी जिंकणे महत्त्वाचे आहे. गेले काही दिवस शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वास्तवाचा अभ्यास केला असून येथे मराठी जनांसहित हिंदुत्ववादी शक्तींना शिवसेना हा ब्रँड वाटतो. हा ब्रँड एकनाथ शिंदे यांच्या हातात सुरक्षित राहील असे लोकांना वाटते, असे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे म्हणाल्या.
या निवडणुकीत आम्हाला लढण्यासाठी अर्धे वॉर्ड्स हवेत असे निष्कर्ष आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईतील जागावाटप चर्चेपूर्वी 21 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने घेतलेल्या प्रारंभिक आढाव्यानुसार 130 जागांचा आग्रह धरणे अपरिहार्य असल्याचे मत व्यक्त केले जाते आहे. स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रमुख या नात्याने गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास झाला आहे.या जागा कोणत्या,त्यांचा तपशील काय हे लवकरच भारतीय जनता पक्षाला कळवले जाणार आहे.
जागावाटपाची अधिकृत चर्चा योग्य वेळी होईल : अमित साटम
एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि त्यांच्या पक्षाने जागावाटपाबद्दल अधिकृत विधाने केलेले नाही, योग्यवेळी आम्ही जगवाटपबद्दल चर्चा करू. जिंकण्याची क्षमता या आधारावर कुणी किती जागा लढायच्या ते ठरवू असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
अत्यंत अभ्यासपूर्वक वॉर्डांमधील शक्तीचा लेखाजोखा आम्ही घेतला आहे, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाशी चर्चा होईल.आमचा मित्रपक्ष आमच्यावर अन्याय करणार नाही याची खात्रीही असल्याचे सांगितले जाते आहे.जागावाटप चर्चेचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच असतील. मुंबईत महायुतीने जिंकावे यासाठी योग्य ती माहिती मांडत राहण्यावर भर आहे. समन्वय समिती वेळोवेळी मत मांडत राहील, असेही आजच्या बैठकीत ठरले असे समजते.