शिंदे गटाची 50 टक्के जागांची मागणी मुंबईत भाजपला लहान भाऊ करणारी  Pudhari File Photo
मुंबई

BMC elections : शिंदे गटाची 50 टक्के जागांची मागणी मुंबईत भाजपला लहान भाऊ करणारी

व्यावहारिक निकषांवरच जागावाटप करण्याची मुंबई भाजपची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने किमान 50 टक्के जागांवर दावा करत भाजप नेतृत्वाकडे त्यासाठी आग्रह धरण्याची तयारी चालविली आहे. मात्र, शिंदे गटाची ही मागणी म्हणजे जागावाटपातच भाजपला लहान भाऊ बनविण्याचा प्रयत्न ठरू शकतो. त्यामुळे भाजपनेही प्रत्येक वार्डातील पक्षीय बलाबल मांडत व्यावहारिक निकषांवर जागावाटप व्हायला हवे, अशी भूमिका घेतली आहे.

2017 च्या निवडणुका प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्यामुळे तेव्हाचे बलाबल हा निकष बाजूला सारत सद्यस्थितीच्या आधारावर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाने किमान 50 टक्के जागा मिळाव्यात असा आग्रह धरला आहे. त्यासाठी 2017 आणि 2012 सालच्या निवडणुकातील विजयी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याचा दाखला दिला जात आहे.

शिंदे गटाच्या या भूमिकेवर भाजपने अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नाही. मात्र, मागील नगरसेवकांचा आधार या निवडणुकीत घेता येणार नाही. 2017 च्या निवडणुका प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. शिवाय, मावळत्या सभागृहातील 65 नगरसेवक शिंदे गटात असल्याचा दावाही भाजप नेते अमान्य करत आहेत. एकसंध शिवसेनेच्या चिन्हावर 84 नगरसेवक निवडून आले होते. पुढे मनसेसह अन्य पक्षातील नगरसेवक ठाकरेनी स्वतःकडे खेचले. शिवसेनेतील दुफळीनंतर बलाबल बदलले आहे. सध्या ठाकरे गटाकडे 56 तर शिंदे गटाकडे 58 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे 50 टक्के जागांसाठी मागील नगरसेवकांचा निकष भाजपकडून बेदखल केला जात आहे.

  • मागील नगरसेवकांपेक्षा व्यावहारिक निकषांचा आग्रह भाजपकडून केला जात आहे. मावळत्या सभागृहातील सर्वाधिक 83 माजी नगरसेवक भाजपकडे आहेत. तर, काँग्रेसकडे 19, सपा 4, अजित पवार गट 2, शरद पवार गट 2, एमआयएम 1 आणि अन्य 2 आहेत. त्यामुळे काँग्रेससह अन्य 25 जागा कोणाकडे जाणार याचा निर्णय घ्यावा. याचा फॉर्म्युला ठरल्यानंतर उबाठा गटाकडील जागा शिंदे गटाकडे की भाजपकडे याचा निर्णय सर्वेक्षण आणि वॉर्डातील सद्यस्थितीच्या आधारे करण्याची भूमिका भाजपकडून मांडली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT