Dombivli Assault on Doctors pudhari
मुंबई

Dombivli Assault on Doctors: कारवाई होणार! श्रीकांत शिंदे डॉक्टरांच्या बाजूने; शास्त्रीनगर रूग्णालय मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

Anirudha Sankpal

Dombivli Assault on Doctors: डोंबिवली मधील शास्त्रीनगर रूग्णालयातील ऑन ड्युटी दोन डॉक्टर आणि दोन परिचारिकांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती. ही घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या निषेधार्थ रूग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफने मंगळवारपासून काम बंदल आंदोलन सुरू केलं होतं.

डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की...

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या प्रकरणी तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कोणालाही पाठीशी घालणार नाही असं स्पष्ट केलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर पोस्ट केली की, 'कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात.'

कोणालाही माफी नाही

श्रीकांत शिंदे पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, 'या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.'

श्रीकांत शिंदे डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

श्रीकांत शिंदे यांनी आपण डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले ते म्हणाले, 'एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.'

काय होते प्रकरण ?

सोमवारी एक महिला प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल झाली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना सल्ला दिला. नवजात बाळाला एनआयसीयु म्हणजे नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचारांची गरज भासू शकते. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील एनआयसीयु विभागातील बेड्स पूर्ण भरलेले असल्याने जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब दुसऱ्या रूग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी दिला.

मात्र नातेवाईक याच रूग्णालयात जागा करण्याची विनवणी करत होते. मात्र जागा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी शास्त्रीनगर परिसरातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. नगरसेवकांनी डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टर रूग्णसेवेत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर रात्री नगरसेवक म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते रूग्णालयात आले. कोणतीही विचारणा न करता डॉ. साळुंखे आणि डॉ. बाविस्कर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT