Delimitation Bill : परिसीमन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. आता ‘इंडिया’ आघाडीतील काही महत्त्वाचे नेते शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जाऊ नयेत म्हणून त्यांची मनधरणी करत आहेत. आज (दि. २९) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी मुंबईत शरद पवारांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते चेन्नईनंतर थेट मुंबईत येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवार आणि संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. मात्र, आता पवार वेगळी भूमिका घेत असतील तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर राऊत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परिसीमन विधेयकावरून शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बिलासंदर्भात वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळताच, संजय राऊत यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या भावनेतून आज ‘परिसीमन विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, तरी ते ‘इंडिया’ आघाडीचा भाग राहतील,’ असे जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत पुढे काय होईल त्याकडे लक्ष ठेवून आहोत, असे सूचित केले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या सत्तेत सामील झाला तर तो विरोधी ऐक्याला बसलेला फटका ठरेल. तृणमूल काँग्रेसच्या पराभवापाठोपाठ आधी द्रमुक आणि आता शरद पवार राष्ट्रवादी यांची भूमिका बदलली आहे.
पक्षातील खासदारांना भारतीय जनता पक्ष केव्हाही फोडू शकेल, या भीतीने परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत सांगत असल्याचे समजते.जर आपण समर्थन देत असू, तर मंत्रिपदे स्वीकाराला हरकत काय, असा सूर या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी लावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.