मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती किंवा आघाडी करायची नाही, अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्या आहेत. त्याचवेळी महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गटासोबत गरज भासल्यास आघाडी करण्याचा पर्याय मात्र पक्षाच्या कोअर कमिटीने खुला ठेवला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथेे शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत युती करायची नाही, असे शरद पवार यांनी या बैठकीमध्ये स्पष्टपणे आपल्या सहकाऱ्यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, तसेच पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते.