मुंबई : राज्यसभा निवडणूक बिनविरोधनंतर शरद पवार हे भावुक झाले असून, जनतेच्या विश्वासामुळेच माझा प्रदीर्घ राजकीय प्रवास होऊ शकला, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावर मांडली आहे.
1967 पासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेला आपला प्रवास आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. हा प्रवास वैयक्तिक नसून, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. कारण, त्यांच्या विश्वासामुळेच हा प्रवास पुढे सुरू ठेवणे शक्य झाले. 1967 मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सार्वजनिक जीवनात सातत्याने काम करत असताना राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषिमंत्री म्हणूनही काम करण्याची जबाबदारी सांभाळली, असे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व पदांवर काम करताना महाराष्ट्र आणि देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच सर्वांत मोठे बळ राहिले आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन मोठा विश्वास दाखवला असल्याचे सांगत शरद पवार यांनी जनतेसह मित्रपक्षांचेही आभार मानले.