Sharad Pawar
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आक्षेपार्ह केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जयंत पाटील बिनडोक माणूस आहे आणि तो दर आठ दिवसांनी आपण किती बिनडोक आहे हे सिद्ध करतो. एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात जयंत पाटील आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला.
या वादग्रस्त टीकेनंतर शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो," असे शरद पवार यांनी फडणवीसांना सांगितले.
या घटनेमुळे राज्यातील राजकारण आणखी तापले असून, आता मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.