Sharad Pawar Pudhari
मुंबई

Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पुन्हा तर्कवितर्क

शरद पवार गटाच्या खासदारांची भाजप नेत्यांशी होणारी भेट हा उत्सुकतेचा मुद्दा झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असतानाच शनिवारी (दि. ८) अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (अजित पवार राष्ट्रवादी) यांनी आयोजित केलेल्या आदिवासी दिन कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवर्जून लावलेली हजेरी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींबद्दल पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

विद्यार्थी आंदोलनामुळे सध्या गतिरोध झालेल्या संसदेच्या अधिवेशनात सीमांकन विधेयक मांडले जाणार का आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपला मदत करणार का, याबद्दल चर्चांना वेग आला आहे.

द्रमुक आणि अण्णाद्रमुकने तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीविरोधात बंडाच्या भूमिकेत आहेत, असा अर्थ काढला जात आहे.

संसदेत द्रमुक सरकारच्या या आवडीच्या विधेयकाबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीची भूमिका घेणार की काय अशी विचारणा सुरू झाली आहे. यामुळेच शरद पवार गटाच्या खासदारांची भाजप नेत्यांशी होणारी भेट हा उत्सुकतेचा मुद्दा झाला आहे.

महाराष्ट्राचा लाभ होत असेल आणि मुख्यत्वे महिलांचा राजकीय सहभाग वाढणार असेल तर सीमांकन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पाठिंबा देऊ शकतो अशी चर्चा जोरात सुरू आहे. सुळे यांनी घेतलेल्या एका पत्रपरिषदेत तसे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले होते. मात्र आता सुरू झालेल्या घडामोडी लक्षात घेता तर्कांना उधाण आले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद हे सध्या चर्चेचा विषय असतानाच आता पुन्हा झिरवळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे हे आदिवासी समाजाबद्दल बांधिलकी दाखवत त्यांचे कृतज्ञ स्मरण करणे आहे.

त्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असेही सांगितले जाते आहे. मात्र यासंदर्भात नक्की कोणत्या घडामोडी सुरू आहेत ते दिल्ली आणि आमचे ज्येष्ठ नेते सांगू शकतील असेही एका नेत्याने सांगितले.

शरद पवार गटाने प्रवक्ते बदलण्याचा निर्णय घेतला असल्याने या पक्षाची फेरबांधणी कशी होते आहे कोणत्या मुद्द्यांना महत्त्व दिले जाणार आहे याबाबतही कमालीची उत्सुकता आहे. येत्या आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात कोणती विधेयके मांडली जातील त्यावर बरेच काही ठरेल असेही सध्या नमूद केले जाते आहे.

सुनेत्रा व पार्थ पवार यांचा संभाव्य प्रवेशाला विरोध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या संभाव्य प्रवेशाला विरोध केला असल्याच्या चर्चा आहेत. प्रत्यक्षात शरद पवार हे एनडीएकडे जाण्याच्या मार्गावर नाहीत, असेही त्यांचे जवळचे सहकारी सांगतात. दुसऱ्या गटाकडून आम्ही भाजपशी मैत्री करणार नाही, शिवाय अजित पवार गटात विलीनही होणार नाही, असे सांगितले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT