मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिलेले असतानाच, या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तशी रीतसर घोषणा शुक्रवारी (दि. २७) करून टाकली.
डिलिमिटेशन अनिवार्य असल्याचे यापूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. यावर ‘माझ्या दैवताची जी भूमिका, तीच माझी,’ असे सांगत आ. आव्हाड यांनी या विधेयकावर पक्षाची भूमिका जाहीर केली.
दरम्यान, ८ खासदारांना घेऊन सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतल्याचे आव्हाड म्हणाले. मात्र, त्याचवेळी पक्षाचे खासदार अमर काळे व अमोल कोल्हे यांनी मात्र याबाबत आमच्याशी आजवर चर्चा झाली नसल्याचे सांगत आव्हाड यांच्या भूमिकेला छेद दिला. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय भूमिका घेतली जाणार नसल्याचेही कोल्हे यांनी म्हटले.
दुसरीकडे, यानंतर थोड्याच वेळात खा. सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. आव्हाड यांच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली. ‘आमची भूमिका सभागृहातच कळेल. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय निर्णय होणार नाही. सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ.’ आव्हाड कदाचित ५० टक्के जागा आणि महिला आरक्षणासंदर्भातील बातम्या पाहून बोलले असतील, अशी सारवासारवही त्यांनी केली.
शरद पवार गटाचा व्हीप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. सर्व खासदारांना ३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान सभागृहात उपस्थिती सक्तीची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) लोकसभा खासदार आणि मुख्य प्रतोद अमोल कोल्हे यांनी हा तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
त्यात लिहिले की, सोमवार ३० नोव्हेंबर ते शुक्रवार ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याने, सर्व सदस्यांची विनंती आहे की, त्यांनी सोमवार ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ या काळात लोकसभेत अनिवार्यपणे उपस्थित राहून पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा.
यावेळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाबतीत शरद पवार गट मोदी सरकारच्या बाजूने जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हीप महत्वाचा मानला जात आहे.