शरद पवार गटाच्या राजकीय कसरती Pudhari File photo
मुंबई

Political News : शरद पवार गटाच्या राजकीय कसरती

एकाच वेळी उद्धव ठाकरे, काँग्रेससोबत अन्‌‍ पुण्यात अजित पवार गटाशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकाचवेळी तीन-तीन पक्षांशी स्वतंत्र बोलणी चालवली आहेत. पुण्यात ते आपले पुतणे अजित पवार यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी वाटाघाटी करत असून मुंबईत मात्र एकमेकांविरुध्द उभे ठाकलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन पक्षांशी बोलणी करत असल्याचे समजते.

शरद पवार यांची ही राजकीय कसरत त्यांना महापालिकेच्या रिंगणात किती मित्र मिळवून देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुंबईत शरद पवारांची उद्धव ठाकरे गटाशी बोलणी सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने 50 जागा मागितल्या होत्या. वाटाघाटीत माघार घेत राष्ट्रवादी 30 जागांवर उतरली. मात्र दहापेक्षा अधिक जागा देणे शक्य नसल्याचे उद्धव यांनी शरद पवारांना कळवल्याचे समजते.

50 जागा लढवण्याची तयारी

या मुद्द्यावर शरद पवार- उद्धव ठाकरे यांची बोलणी थांबल्याचे बुधवारी सांगितले जात असतानाच शरद पवारांशी बोलणी अजून सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादीतील सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंशी नाहीच जमले तर 50 जागा लढवण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे.

काँग्रेसकडून अद्याप उत्तर नाही

दुसरीकडे शरद पवार गटाची काँग्रेसशीही बोलणी सुरू आहेत. ही बोलणी खास करून मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी असल्याचे म्हटले जाते. शरद पवार गटाने पुण्यात 40 हून अधिक जागा मागितल्या असून पिंपरी चिंचवडमध्येही 25 ते 30 जागांची अपेक्षा या गटाला आहे. काँग्रेसकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. गुरुवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहिली जाईल, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

  • मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांशी बोलणी सुरू असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, शरद पवार गटाने 50 जागा मुंबईत मागितलेल्या नाहीत. अजून आमची चर्चा सुरू आहे. रावसाहेब जानकर आणि राजेंद्र गवई यांच्याशीही आमची बोलणी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीसोबत गुरुवारपर्यंत आम्ही चर्चा करू. सर्व राजकीय वटाघाटी करण्यासाठी आम्ही आमच्यासाठी 27 डिसेंबरची डेडलाईन निश्चित केल्याचेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT