Sharad Pawar file photo
मुंबई

Maharashtra Politics: शरद पवार गट इंडिया आघाडीतच; मोदींच्या भेटीवरून उबाठा-काँग्रेसमध्ये मतभेद

सोमवारी (दि. १०) शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार कुठलीही वेगळी भूमिका घेणार नसून सुप्रिया सुळे यांच्याशी आपली यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी ते कशासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत हे आम्हाला माहिती नाही, असे सांगत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.

सोमवारी (दि. १०) शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे. सोमवारी दिल्लीत त्यांची कन्या रेवती हिच्या विवाहाप्रीत्यर्थ स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

रेवतीचा विवाह भाजप नेते विधान परिषद सदस्य अरुण लखानी यांचे पुत्र सारंग यांच्याशी झाला आहे. त्यातच सोमवारी शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार भेटून काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सीमांकन विधेयकाला पाठिंबा देण्याची ही तयारी तर नाही ना या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. यासंदर्भात संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना या भेटीबाबत आपण सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो आहे. दोन खासदारांच्या मतदारसंघात काहीतरी काम होते, त्यामुळे त्यांना सरकार पक्षाला विशेषकरून पंतप्रधानांना भेटायची इच्छा होती.

भेटीसाठी वेळ घ्या अशी त्यांनी विनंती केली, त्यावर केवळ एक-दोघांनी न जाता पक्षाचे सगळेच खासदार त्यांना भेटायला जाऊ, असे सुळे यांनी सांगितले होते. त्यानुसार ही भेट आहे.

शरद पवार राष्ट्रवादी गट हा इंडिया आघाडीतच असून ते कुठेही चाललेले नाहीत, असे सुळे यांनी आपल्याला सांगितले. तशी आपल्याला खात्री असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सीमांकन विधेयक येतेय कुठे? : वर्षा गायकवाड

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटतायेत हे आम्हाला माहिती नाही. काय कारण त्यांचे त्यांनाच माहीत असेल, असे सांगत कानावर हात ठेवले. सीमांकन विधेयकासाठी शरद पवार यांचा गट एनडीएला पाठिंबा देऊ शकतो काय याबाबत विचारता गायकवाड यांनी हे विधेयक येतेय कुठे, असा प्रतिसवाल केला.

इंडिया आघाडीतील दोन पक्षांची वेगवेगळी भूमिका

सत्ताधारी आघाडीकडे बहुमत नसल्यामुळे या संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक येण्याची कोणतीही शक्यता नसल्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे मात्र त्यासाठी लाठीमार करणाऱ्या यंत्रणेबद्दल काय भूमिका घेतली जाईल हे आधी स्पष्ट केले पाहिजे असेही त्या म्हणा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संभाव्य भेटीबद्दल महाराष्ट्रातील सदस्य असलेल्या दोन पक्षांनी घेतलेली ही वेगवेगळी भूमिका राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT