उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार pudhari photo
मुंबई

Sunetra Pawar Decision Row-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना स्वतः निर्णय घेऊद्या !

शरद पवार गटाचा सत्ताधारी राष्ट्रवादीला सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बीड येथील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांनी बाजू मांडल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांना स्वतः निर्णय घेऊद्या, असा सल्ला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

सुनेत्रा पवार यांनी बोलायचे सोडून बाकीचे लोकच पुढे येऊन बोलत असतात, अशा शब्दांत शिंदे यांनी खंतही व्यक्त केली आहे. सुनेत्रा वहिनींना वेळ द्या, त्यांच्यावर लगेच टीका नको एखाद्या गृहिणीवर किंवा भगिनीवर अचानक जेव्हा मोठी राजकीय जबाबदारी येते, तेव्हा ती पेलण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्या सर्वांना सोबत घेऊन निश्चितपणे चांगले काम करतील. त्यामुळे त्यांच्यावर लगेच चर्चा करणे योग्य नाही, असेही शिंदे म्हणाले. सुनेत्रा पवार चांगले निर्णय घेतात. पण त्यांच्या आधी बाकीचे लोक मीडियासमोर जाऊन बोलतात. त्यांनी निर्णय घेण्याऐवजी इतर लोकच पुढे येतात. आपल्या नेत्याची उंची राखण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांनी करणे गरजेचे आहे, असा खोचक सल्ला शिंदे यांनी दिला.

शरद पवार गटात फेरबदल शरद पवार राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत. आम्ही जम्बो कार्यकारिणी आणि जम्बो प्रवक्तेपद न ठेवता मोजक्या आणि सक्षम लोकांच्या नेमणुका करणार आहोत, असेही शिदे म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने केवळ बाजूला बसावे ! सुनील तटकरे यांनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावे. पण पत्रकार परिषद सुरू असताना स्वतः भाग घेणे योग्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे कान टोचले.

मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी मुंडे यांचे नाव न घेता निशाणा साधला. बीडमधील पत्रकार परिषदेबाबत धनंजय मुंडे यांच्याशी आपले बोलणे झालेले नाही. त्यामुळे तेथे काय घडले, याची नेमकी माहिती नाही. पण पालकमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक आमदारांनी बाजूला बसणे सामान्य बाब आहे.

मध्यंतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रायगडला आले होते, तेव्हा जी पत्रकार परिषद झाली तेव्हा आपण त्याठिकाणी बोललो नाही. आता धनंजय मुंडे हे त्या पत्रकार परिषदेत कोणत्या संदर्भात बोलले याची माहिती घेईन, असेही तटकरे म्हणाले. सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रसारमाध्यमांसमोर त्या विषयाची मांडणी समपर्क पद्धतीने करू शकतात, हा पक्षातील सर्व सहकाऱ्यांना विश्वास आहे, असे तटकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT