राजेंद्र पाटील
नवी मुंबई: मुंबई एपीएमसीचे सचिव शरद जरे यांच्याकडे गेल्या एप्रिलमध्ये देण्यात आलेला एपीएमसी सचिवासह पणन संचालक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आला असून कार्यकारी संचालक कृषी पणन मंडळ तथा अप्पर निबंधक संजय कदम यांची नियुक्ती पणन संचालक पदावर करण्यात आली आहे.
मुंबई एपीएमसीच्या सचिव पदावर शरद जरे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांना पुन्हा पणन संचालकपदाचे वेध लागले होते. पणन संचालक होण्यासाठी आणि त्या पदावर वर्णी लागावी म्हणून जरे यांना खूप परिश्रम आणि कष्ट घ्यावे लागले.
७ एप्रिल रोजी घेतलेल्या कष्टाला फळ म्हणून शरद जरे यांना पणन संचालक या पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. मात्र जेमतेम सात महिन्यांत शरद जरे यांच्याकडून पणन संचालक पदाचा अतिरिक्त कारभार शुक्रवारी काढून घेण्यात आला.
पणन संचालक या महत्त्वाच्या पदावर अप्पर निबंधक संजय कदम यांची नियुक्ती पणन खात्याकडून करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहून या पदोन्नतीवर नियुक्ती केल्याचे पणन खात्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी नियुक्ती आदेशात नमूद केले आहे. या नियुक्तीने मुंबई एपीएमसीत खळबळ उडाली असून चर्चेला ऊत आला आहे. शरद जरे यापूर्वी याच मुंबई एपीएमसीत सहसचिव पदावर होते.
आता सचिव म्हणून आल्यानंतर त्यांनी अध्यक्ष प्रशासकीय घडामोडी करत मोठा बदल केला. अध्यक्ष आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी दौरा आयोजित करण्याच्या आदल्या रात्री धोकादायक कांदा-बटाटा मार्केटच्या उपसचिवाची नियुक्ती केली. काही अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.
एपीएमसीचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग आणि प्रयत्न जरे यांनी सुरू केले. दाणाबाजारातील ४० कोटींच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामावरून माजी संचालकाला बाजूला करत थेट वर्क ऑर्डर देण्याचा विषयदेखील गाजत आहे. उल्हासनगर येथील कंत्राटदाराला हे काम दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दाणा मार्केटच्या माजी संचालकाने याच ४० कोटींच्या कामासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना मुंबई एपीएमसी राष्ट्रीय बाजार समिती झाल्यानंतर अपयश आले. हे काम उल्हासनगर येथील कंत्राटदाराला देण्यासाठी अनेक दिग्गजांचा हातभार लागल्याची क्लास वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणात काही प्रभारी उपसचिव महत्त्वाची भूमिका बजावण्यात अजूनही व्यग्र असल्याचे सांगण्यात येते.